अमळनेर:- पांझरा नदीत बोदर्डे येथील शाळेजवळील प्लॉट भागातील एक तरुणाचा पाय घसरून नदीत अडकलेल्या एका तरुणाला व त्याला वाचवायला गेलेल्या दुसऱ्याला स्थानिक तरुणांनी वाचवले असून प्रशासन यंत्रणेच्या हालचाली देखील तात्काळ गतिमान झाल्या होत्या.
२७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारस बोदर्डे येथील प्लॉट वस्तीतील (संजय राजेंद्र भिल वय ३२) हा तरुण शौचास गेलेला असतांना पाय घसरून नदीत पडल्याने बोदर्डे येथील पोलीस पाटील गायत्री चौधरी यांनी तात्काळ प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंत्री अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक सचिन बेहरे यांना माहिती दिली. त्यावरून प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने धुळे येथील एसडीआरएफला माहिती कळविली होती.दरम्यान संजय भिल हा नदीत पाण्यात एका विहिरीच्या भरावावर चोंधी वस्तीजवळ अडकला असतांना एक मच्छिमार तरुण काशिनाथ प्रकाश भिल हा ट्यूब घेऊन तो थांबलेल्या विहिरीच्या दगडांवर पोहचला. ही बाब माहिती पडताच बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्याठिकाणी दोघांना थांबण्याचा धीर दिला. व बचाव कार्याची वाट पाहत होते. दरम्यान गावातील पट्टीचे पोहणारे चार तरुण उमेश कोळी, सागर भिल, दादू भील, समाधान भील यांनी धाडस करून नदीत उड्या घेऊन त्या संजय भिलपर्यंत पोहचले. व पाचही जणांनी त्या तरुणाला काठापर्यंत आणले. त्यावेळी त्याच्या घरच्यांना व गावकऱ्यांना हायसे वाटले. दरम्यान प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार, रुपेशकुमार सुराणा व मारवड पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. यावेळी तलाठी प्रदीप भदाणे हे देखील थांबलेले होते. तरुण वाचल्याने प्रांताधिकारी यांनी गावकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले. व एसडीआरएफ पथक धुळे तालुक्यातील नगाव गावापर्यंत येत असताना पथकाला परत पाठविण्यात आले. यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी मारवड पोलिस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील, हेकॉ सुनील तेली, राजेंद्र पाटील, दिनेश पाटील, होमगार्ड मनोज पाटील, भूषण शिंदे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.