
सात्री गावाची समस्या सोडवण्यात प्रशासन हतबल…
अमळनेर:- एकीकडे महाराष्ट्र शासन विकासाचा गवगवा करीत असताना तालुक्यातील सात्री गावाला नदीवर पुलही नाही आणि रस्ताही नसल्याने गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
बोदर्डे गावाजवळ चोंदी येथील दोन तरुण नदीत अडकल्यानंतर मुंबईहून यंत्रणा हलली आणि एस डी आर एफ यंत्रणा बोलावण्यात आली. मात्र सात्री गावाची समस्या सोडवण्यात प्रशासन हतबल ठरले आहे. तामसवाडी धरण फुल भरल्यावर बोरी नदीत पाणी सोडण्यात आले. सात्री गावाला जायला रस्ताच नाही त्यामुळे आजारी नागरिक, शालेय विद्यार्थी , तथा इतर कामासाठी लोकांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या गावाची समस्या सुटू शकत नाही याचे अनेकांना आश्चर्य वाटते. सतत पाऊस असल्याने निंभोरा गावाकडून जंगलातून चिखलातून चार पाच किमी अंतर चालून देखील जीव धोक्यात घालून जावे लागते.
सात्री गावचे अनेक विद्यार्थी डांगरी येथे माध्यमिक शाळेत , अमळनेर येथे सानेगुरुजी शाळेत ,प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. २८ पासून चाचणी परीक्षा सुरू झाली मात्र पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थी परीक्षेला जाऊ शकले नाहीत. एक पालकाने आपल्या मुलीला लोंढवे येथे पोहचवून दिल्याचे समजते. तर सात्री येथे देखील प्राथमिक शाळेत एक शिक्षक पोहचू शकला नाही.
प्रतिक्रिया…
एका रुग्णाला दररोज दवाखान्यात आणत होतो. मात्र आता आणणे अशक्य झाल्याने त्याला गावातच पोहणाऱ्यांच्या हस्ते औषधी पोहचविले जात आहेत. – विनोद पाटील ,पोलीस पाटील, सात्री
गावकऱ्यांनी पर्यायी रस्त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रशासनाची देखील अडचण झाली आहे. – महादेव खेडकर , उपविभागीय अधिकारी , अमळनेर




