वाहनाखाली ७० फूट घसरत नेल्याने मृतदेह झाला छिन्नविच्छिन्न…
अमळनेर:- धरणगाव अमळनेर रस्त्यावर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या इसमाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी पहाटे घडली आहे.
तालुक्यातील कुऱ्हे येथील पोलिस पाटील राकेश नाना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ३१ रोजी पहाटे ०१:३० ते ०३:३० दरम्यान मयत भटु दगा चव्हाण (रा. कर्ले ता. शिंदखेडा) हा रस्त्यावरील बॉबी हॉटेलसमोर दुचाकी लावून रस्ता ओलांडून हॉटेलकडे जात असताना धरणगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देवून अंगावरून वाहन चालवून ७० फूट घसरत नेले. त्यामुळे सदर इसमाचा जागीच मृत्यू होवून मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला. व सदर वाहनधारकाने न थांबता घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत सदर अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.