अमळनेर : पंढरपूर यात्रा , मुख्यमंत्री दौरा , पंतप्रधान दौरा आणि आता गणेशोत्सवासाठी अमळनेर आगाराच्या ३० एस टी गाड्या कोकणात गेल्याने प्रवाश्यांचे हाल होणार आहेत.
आधीच अमळनेर आगारात फक्त ६९ एस टी बस अपूर्ण पडत आहेत. तालुक्यातील अनेक भागात शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमाच्या दौऱ्यावेळी जादा बसेस गेल्याने इकडे नियमित प्रवाश्यांचे हाल झाले. शासकीय दौऱ्याचा खर्च शासन करणार असले तरी एस टी महामंडळाला ती रक्कम रोख मिळाली नाही ती शासनाकडे बाकी आहे. एस टी महामंडळाची लाखो रुपये थकबाकी शासनाकडे आहे.
आगारातून एस टी बाहेर गेली की इकडे लांब व लघु पल्ल्याच्या बस फेऱ्या बंद होऊन इकडे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होते. खाजगी बसेस चालकांकडून मुंबई पुणे साठी किमान दोन हजार भाडे वसूल केले जाते. तसेच चोपडा धुळे जाण्यासाठी साठ रुपये भाडे असताना शंभर रुपये टॅक्सी चालक व खाजगी वाहनांसाठी घेतले जातात. नुकताच दोन दिवस संप झाल्याने देखील विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. आताही ६९ बसेस पैकी ३० बसेस गणेशोत्सवाला गेल्याने अनेक फेऱ्या बंद झाल्याने प्रवाश्याना खाजगी बसेस मधून जावे लागत आहे. खाजगी बसेस अथवा टॅक्सी मध्ये जेष्ठ नागरिक , महिला ,विद्यार्थी याना सवलत मिळत नसल्याने त्यांना पूर्ण भाडे पेक्षा दुपटीने जादा भाडे भरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान प्रशासकीय कारणास्तव एस टी बसेस अथवा फेऱ्या कमी झाल्यास वाहक चालक यांचे काम कमी झाले तरी त्यांचे वेतन कमी करू नये असा शासन निर्णय असताना देखील त्याचे परिणाम कर्मचाऱ्यांवर होत आहे. कर्मचार्यांना सक्तीने रजेवर जावे लागत आहे. त्यामुळे वेतन कापले जात आहे.