अमळनेर : आदल्यादिवशी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने एक जखमी झाला असून एक बचावला आहे. दोन आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिली.
५ रोजी रेल्वे स्थानकाजवळ शिंदे नामक एक पायाने अपंग असलेल्या रिक्षा चालकाला रेल्वे अभियंत्याने कट मारला असा आरोप करत रिक्षावाला त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गोंधळ घालायला गेला होता. त्यावेळी त्या अभियंत्याने तात्काळ रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचारीला बोलावले. हरेंद्रकुमार नावाचा कर्मचारी तेथे पोहचल्यावर त्याने रिक्षाचालकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याला राग आला त्याने हरेंद्रकुमार एक धमकी दिली. सहा रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जीआरपी कार्यालयासमोर राहुल पाटील उर्फ रामजाने व शुभम पाटील उर्फ बंम आणि शिंदे या तिघांनी एकत्र येत हरेंद्रकुमार याच्यावर चाकूने वार केला. हरेंद्रकुमार याने तो वार हातावर अडवण्याचा प्रयत्न केला असता अंगठ्याजवळ हात फाटून जखम झाली व हात फ्रॅक्चर झाला. तर अर्जुनसिंग या आरपीएफ कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला मात्र गणवेशाच्या पट्ट्यामुळे पोटात चाकू घुसला नाही. अन्यथा अनर्थ घडला असता. आरोपींच्या मागे रेल्वे पोलीस धावले. शहरात एका ठिकाणी नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच प्रसाद दिला. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीना जीआरपी च्या ताब्यात देऊन नंदुरबार येथे नेणार आहेत. तर जखमी हरेंद्रकुमार याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.