अमळनेर : तालुक्यात सप्टेंबर महिना सुरू झाला तोपर्यंत पावसाने सरासरीची शंभरी ओलांडली असून वार्षिक ६७० मिमी पाऊस अपेक्षित असताना ७६६ मिमी म्हणजे ११४ टक्के पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील चौबारी येथे दोन घरे पडून नुकसान झाले आहे.
जून महिन्याच्या सात तारखेपासून सतत पाऊस सुरू आहे. मध्यंतरीच्या चार ते पाच दिवसांचा खंड सोडल्यास अमळनेर तालुक्यात दररोज पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओलावा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांचे धाबे भिजून माती जड झाल्याने घरे कोसळण्याची शक्यता आहे. तर चौबारी येथे पुंडलिक हरचंद पाटील व बारकू देविदास पाटील या दोघांची घरे ५ रोजी अचानक कोसळले. घरातील सामान दाबले जाऊन साधारणतः प्रत्येकाचे किमान एक एक लाखाचे नुकसान झाले आहे. शिवसेना (उबाठा) चे माजी तालुका प्रमुख विजय पाटील यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून शहरी वस्तीत देखील नागरिकांना त्रास होत आहे. तर उडीद ,मूग पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे अतिपावसाने कुपोषण होऊन उत्पादन क्षमता कमी झाली. मक्याचे उत्पन्न २५ ते ३० टक्के कमी झाले आहे. मक्याच्या कणसावर अळ्या पडल्याने कणीस आतून पोखरले जात आहेत.दाणे कमजोर झाले आहेत. कपाशी पिकावरील फुलफुगडी पडू लागली आहेत तर कैऱ्या कमी आल्या. सप्टेंबर पर्यंत कापूस उत्पादन झाले पाहिजे होते मात्र अजूनही कापूस उत्पादन आलेले नाही. एका बिघ्याला १० क्विंटल चे उत्पन्न अपेक्षित असताना साधारणपणे पाच क्विंटल उत्पन्न येईल. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी येणार असल्याने शेतकरी तोट्यात जाणार आहेत. अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांच्यासह किसान काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन मदत व पुनर्वसन तसेच महसूल व वनविभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. तर अमळनेरच्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी संजय पुनाजी पाटील यांनी केली आहे.