
वाटप थांबवल्याने लाभार्थ्यांनी मंगरूळ येथे रस्ता रोको करून वाहतूक थांबवली…
अमळनेर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या भांडे वाटप योजनेचा ठेकेदाराने गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद केल्याने संतप्त कामगार महिला आणि पुरुषांनी मंगरूळ जवळील अमळनेर धुळे रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक थांबली होती.
गेल्या तीन दिवसांपासून मजुरांचे हाल होत होते. मजुरांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. ठिय्या आंदोलनाचे वृत्त कळताच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला. संबंधीत ठेकेदाराच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, नाईलाजाने तहसीलदार सुराणा यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्याशी संपर्क करून सदर ठेकेदारावर कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचे सुराणा यांनी सांगितले.
अमळनेर शहराजवळील मंगरूळ जवळ असलेल्या गोदामातून गृहपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत होते. या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. लाभार्थी तीन-तीन दिवस ठाण मांडून येथे मुक्कामी होते गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद झाल्याने कामगार वर्ग संताप व्यक्त करत होता,
शहरापासून दूर मंगरूळ बाहेर भांडे वाटप होत असल्याने तेथे लाभार्थ्यांची गैरसोय होत होती,वाटप केंद्रावर लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व इतर मुलभूत सोयी सुविधा नव्हत्या तसेच एकाचवेळी शेकडो लाभार्थ्यांना बोलवल्यामुळे भांडे वाटप यंत्रणा कोलमडली. गोंधळ उडाला यावेळी महिलांनी ठेकेदारांने पैसे घेतल्याचा देखील आरोप केला .
तीन दिवसांपासून कामगारांची हेळसांड झाल्याचे कळताच पत्रकार अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली, तहसीलदार , प्रांत आणि जिल्हाधिकारी यांना ही बातमी फोनवरून कळवली त्यानंतर रात्री तहसीलदार सुराणा यांनी वाटप केंद्रावर भेट दिली व सदर ठेकेदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तो बुधवारी रात्री देखील होऊ शकला नाही मात्र गुरुवारी पुन्हा वाटप बंद करून ठेकेदाराने पोबारा केल्याने कामगार महिला संतप्त झाल्या व त्यांनी रस्ता रोखो आंदोलन केले.मात्र प्रांत तहसीलदार यांनी सदर वाटप कामगार आयुक्तांकडून होत असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे उत्तर दिले,व ठेकेदारांच्या अपुऱ्या नियोजनामुळे वाटप यंत्रणा कोलमडली,असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवू असे प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले.




