
जळगाव जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक मोर्चात सहभागी होणार
अमळनेर:ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १२ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे किंवा कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने येत्या २४ सप्टेंबर पासून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे २० हजार संगणक परिचालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवास स्थानावर काढण्यात येणार आहे.
शासन जो पर्यंत मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत ठाणे सोडणार नसल्याचा निर्धार केला असल्याची माहिती संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत मध्ये मागील १२ वर्षापासून संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत.परंतु शासनाने संगणक परिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे,तसेच मागे संगणक परिचालकांच्या आंदोलनाची दखल घेऊन १६ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३००० रुपये मासिक मानधन वाढवल्याची घोषणा केली,त्यातच csc –spv या कंपनीचा करार ३० जून रोजी रद्द केला व १९ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प चालवण्यासाठी दिला,परंतु महाआयटीने सदरील प्रकल्प चालवण्यास नकार दिल्याने संगणक परिचालकांना अद्याप कोणाकडूनही नियुक्ती मिळाली नाही,त्यात ग्रामविकास विभागाने ११ जानेवारी २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आवश्यक असताना त्याकडे ग्रामविकास विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.




