
मिरवणूकीत अज्ञात इसमाने गावठी पिस्तुलने दोनवेळा केले फायर…
खा. वाघांसह जमाव पोलिस ठाण्यात, समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल…
अमळनेर: ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशा आक्षेपार्ह घोषणा देत धार्मिक भावना दुखवणाऱ्या तसेच मिरवणुकीत बेकायदेशीर शस्त्र काढून फायर करणाऱ्या समाज कंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ रोजी मिरवणुकीतील गैरप्रकाराची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांच्यासह ३०० ते ४०० लोकांचा जमाव पोलीस स्टेशन मध्ये जमला होता. खासदार स्मिता वाघ आक्रमक झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी योग्य तक्रार द्या गुन्हा अवश्य दाखल केला जाईल कोणालाच माफ केले जाणार नाही असे आश्वासन दिले होते.
भाजप चे शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी आज २१ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की १९ रोजी वाजेदरम्यान ईदनिमित शहरातून जुलूस काढण्यात आला. दुपारी मिरवणूक झामी चौकात आली असता काही लोक आक्षेपार्ह घोषणा देऊन शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका अनोळखी माणसाने तोंडाला रुमाल बांधून गावठी पिस्तुलने दोनवेळा फायर केला. नंतर बाजार पेठेत जुलूस आल्या नंतर एका अनोळखी इसमाने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारताच्या सार्वभौमत्व व एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने घोषणा देत होता. तसेच जुलूस मधील शाहरुख छोटा मेवाती (रा कसाली डी पी) , शोहेब आबीद मिस्तरी ,फयजाज आरिफ , दानिश शेख मुख्तार (रा शाहआलम नगर) ,कुबा भाई (रा चुना घाणी परिसर), सलमान रफा व कालु भाजीवाल्याचा मुलगा (रा. जिनगर गल्ली) व इतर काही व्यक्तीं चिथावणीखोर घोषणा देत होते. दुपारी ३ ते ४ दरम्यान जुलूस मधील काही व्यक्ती हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले व मांगीर बाबांचे स्मारक असलेल्या दगडी दरवाजाच्या बुरुजावर चढून हिरवा झेंडा फडकवून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या व गावात दहशत निर्माण केली. अशी फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे , शस्र कायदा आदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.
दरम्यान याबाबत डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करणार असून दोषींना लवकरच अटक केली जाईल असे सांगितले.




