गणेशोत्सवात पत्रकारांच्या उपक्रमाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक
अमळनेर-संतांची व महापुरुषांची भूमी असलेले अमळनेर शांतच हवे अशी आमची अपेक्षा असुन येणाऱ्या काळात आपले अमळनेर आपल्याला सांभाळायाचे आहे,ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अमळनेर भूमीत गालबोट लागणे अशोभनीय असल्याची भावना अमळनेर पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे उपस्थित होते. विशेष करून गणेशोत्सव आणि ईद सणात पत्रकार बांधवानी संयमाची भूमिका घेत तोलामोलाचे वृत्तांकन केले,याशिवाय गणेशोत्सवात पोलीस प्रशासनास सहकार्य म्हणून विसर्जन मिरवणुकीत शांतीदूत सारखे उपक्रम राबवून मिरवणूक लवकर आटोक्यात आणण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सौ कविता नेरकर यांनी विशेष कौतुक केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगत पोलीस प्रशासनाकडून सर्वांचे आभार व्यक्त केले.
तसेच सध्याच्या शहराच्या परिस्थिती बाबत बोलताना ते म्हणालेत की पोलीस प्रशासन सज्जच आहे,काहींकडून तरुण मुलाना वेगळ्या पद्धतीने सांगितले जात असून मुलांच्या भविष्यासाठी हे घातक आहे.शहरांतीलच एक मुलगा एस आर पी एफ मध्ये सिलेंक्ट झाला असताना केवळ त्याचे एका गुन्ह्यात नाव असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे,मात्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने यातुन मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत,परंतु प्रत्येक वेळी असे घडणार नाही,जे तरुण मूल पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत त्यांनी यापासून दूरच राहिलेले चांगले अन्यथा भविष्यासोबत खेळ होणार आहे.सध्या आम्ही महाविद्यालयात असो किंवा इतर ठिकाणी असो सर्वत्र फिरून मुलांशी चर्चा करून प्रबोधन करीत आहोत,काही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील यासाठी पुढे आले पाहिजे, आपल्याला येणाऱ्या काळात अमळनेर सांभाळायचे आहे एवढीच भावना प्रत्येकाने मनात ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तसेच नुकत्याच झालेल्या काही प्रकाराबाबत
पोलीस तपास करत असून जे निष्पन्न होतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल,कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी बोलताना दिली.