
अमळनेर : पावसाचा हवामान अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी घाई करत मका विक्रीला आणला मात्र आर्द्रता असल्याने कमी भाव मिळाला म्हणून काही शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अखेर सभापती अशोक पाटील यांच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरू झाला.
आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या घरातील मका लवकर विकण्याचा निर्णय घेतला. मात्र हा मका २१००- २२०० रुपये भावाने घेतला जावा असा आग्रह काही शेतकऱ्यांनी धरला होता. परंतु मका ओला असल्याने आर्द्रतेचे प्रमाण भरपूर असल्याने मक्याला १६०० ते १७०० भाव दिला जाईल असे व्यापारीकडून सांगण्यात आले. यावर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद होऊन लिलाव बंद पाडण्यात आला. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते.
यावेळी सभापती अशोक पाटील यांनी तात्काळ जाऊन चर्चा केली. ओला मका खरेदी केला तर व्यापाऱ्यांना तूट येईल. हमी भाव देणे शक्य नाही. परंतु जर इतर बाजार समित्यांच्या तुलनेत व्यापाऱ्यांनी कमी भाव दिला तर शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. चर्चेच्या वेळी शिवाजी पाटील , विजय पाटील , चंद्रशेखर भावसार , संचालक प्रा सुभाष पाटील , वृषभ पारख , प्रकाश वाणी आदी संचालक व शेतकरी हजर होते.




