
अमळनेर:- अनुकंपाची नोकरी सुनेऐवजी आपल्याला मिळावी म्हणून नंदेने प्रियकराच्या मदतीने भावजयीचा खून केल्याची घटना २२ रोजी सकाळी गांधलीपुरा भागात मेहतर कॉलनीत घडली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी निष्पन्न केले आहेत.

पारोबाई परशुराम घोगले (वय ५५) ही महिला नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते. तिचा मुलगा जय घोगले हा सतत आजारी असतो व दारू पितो तो सायकल दुकानावर कामाला जातो. पारोबाईची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोघी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काटेरी झुडुपात शौचास गेल्या होत्या. मुलगी मंगला ही १० ते १५ मिनिटात परत आली सुनबाई परत का आली नाही म्हणून विचारले असता मुलीने सांगितले की, नळ आले आहेत, तुम्ही पाणी भरून घ्या, मी कोरडी लाकडे घेऊन येते असे सांगून मला पुढे पाठवले. त्यांनतर मुलगी मंगल ही गांधलीपुरा भागातील लक्ष्मी टॉकीज जवळून मटण घेऊन परत आली तरी सून परत आली नाही म्हणून सर्व जण तिला शोधायला काटेरी झुडुपात गेले असता शीतल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेला दिसत होता. तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही घटना कळताच मेहतर समाजाचे २०० ते २५० लोकांचा जमाव जमला होता. व आरोपी अटक करत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही तसेच पोस्टमार्टेम पारदर्शी झाले पाहिजे म्हणून जमाव आग्रही होता. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी मृत महिलेचे शव इंनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. शीतलच्या सासूच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, उज्वल पाटील, हितेश बेहरे ,सागर साळुंखे, निलेश मोरे ,जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, होमगार्ड पूनम हटकर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी,प्रवीण मांडोळे, संदीप पाटील यांनी पाहणी केली.
असा उघडकीस आला खून….
संतप्त जमावाचा रोष पाहता पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली. शीतल सोबत गेलेल्या मंगला हिचीच चौकशी सुरू केली. मंगला हिने मी शौचाहून अवघ्या पाच मिनिटात परत आली असे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना ती सीसीटीव्हीमध्ये तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली. मंगला हीचा प्रियकर असल्याचे समजताच तिला विचारपूस केल्यावर मी त्याच्याशी कधी पासून बोललेली नाही असे तिने सांगितले प्रत्यक्ष सिडीआर रिपोर्ट तपासले असता ती वारंवार आणि रात्री देखील प्रियकर करणशी बोलल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा दोघांवर अधिक संशय बळावला. पोलिसांना तपासात असे निष्पन्न झाले की, पारोबाई हीचा मुलगा आजारी व दारू पित असल्याने त्याचे काही खरे नाही. आईच्या जागेवर अनुकंपा तत्वावर शीतलचे काम होईल आणि जर शीतलच राहिली नाही तर अनुकंपाची नोकरी आपल्याला म्हणजे मुलीला मिळेल आणि आपण प्रियकरासोबत आनंदाने जगू या उद्देशाने मंगला हिनेच प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४ रा अयोध्यानगर बंगाली फाईल) याच्या मदतीने हाताने गळा दाबून व दगडाने डोक्यावर व हातावर गळ्यावर वार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.




