अमळनेर : येथील भोईवाड्यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी (वय ३२) याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
विशाल याच्यावर दहशत निर्माण करणे ,दुखापत करणे , दारू तयार करून कब्जात बाळगणे ,विक्री करणे , जबरी चोरी , हातात शस्र घेऊन दहशत निर्माण करणे , हिंदू मुस्लिम दंगलीत सहभाग , सरकारी कामात अडथळा आणणे , जाळपोळ असे सात गुन्हे दाखल होते. त्याच्यावर पाच वेळा प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली. तरी देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही म्हणून त्याच्यावर यापूर्वीही एमपीडीए कारवाई करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्याची मुक्तता करण्यात आली होती. तो परत आल्यानन्तर त्याने स्थानिक लोकांशी वाद घालून भोईवाड्यातील मंदिरातील वस्तू पेटवल्या म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो कारागृहात होता. गणेशोत्सव व ईद सण आटोपल्यावर तो अमळनेर शहरात आला होता. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्यामार्फत विशाल याचा एमपीडीए प्रस्ताव तयार केला. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यावर त्याला स्थानबद्ध करून कोल्हापूर रवाना करण्याचे आदेश दिले. आज २८ रोजी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , मिलिंद सोनार , विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के ,मंगल भोई यांचे पथक त्याला कोल्हापूर कारागृहात नेण्यासाठी रवाना झाले. विशालला झामी चौक परिसरातून अटक करण्यात आली. त्याला पकडण्यासाठी वरील पथकासह सिद्धांत शिसोदे ,अमोल पाटील ,गणेश पाटील ,जितेंद्र निकुंभे , निलेश मोरे,चरणदास पाटील या पोलिसांचेही सहकार्य लाभले.