
आर के नगर भागातील रहिवाश्यांनी दिले निवेदन…
अमळनेर:- आर के नगर भागात सुमारे दीड महिन्यांपासून गुडघाभर पाणी साचल्याने घराबाहेर कसे पडावे अशी अडचण रहिवाश्यांना निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरल्याने महिलावर्ग आजारी पडला आहे.
आर के नगर भागात पारस विठ्ठल पाटील व दीपक आगलावे यांच्या घराजवळ एक दीड महिन्यांपासून गुडघाभर पाणी साचले असून घरातून बाहेर कसे पडावे असा प्रश्न या कुटुंबांना पडला आहे. अति पावसाने भुयारी गटारीचे चेंबर भरून त्यातील पाणी बाहेर पडत असल्याने डबक्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी तसेच डास कीटक वाढल्याने या कुटुंबासह आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका पोहचला आहे. या कुटुंबातील महिला आजारी पडली असून रुग्णालयात दाखल आहे. प्रत्येक कामासाठी पाण्यातून यावे जावे लागत आहे. नगरपालिकेला निवेदन देऊन देखील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही किंवा जायला यायला रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही. तर भुयारी गटार ठेकेदार अथवा जीवन प्राधिकरण कडून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पारस पाटील,दीपक आगलावे, मृणालिनी, डॉ आर एस पाटील, संतोष भावसार , गणेश नेरकर, माधुरी साबळे,हर्षा भोईटे,लीलाधर पाटील, उर्मिला पाटील, ललित मराठे,तेजस्विनी पाटील,समाधान पाटील आदींनी ३ सप्टेंबर पासून निवेदन दिले आहे.
प्रतिक्रिया…
प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. जीवन प्राधिकरण व भुयारी गटार ठेकेदार, आरोग्य निरीक्षक यांच्याशी चर्चा करून योग्य ती उपाययोजना केली जाईल.- तुषार नेरकर,मुख्याधिकारी,अमळनेर नगरपरिषद




