
दुभंगलेले टाळू आणि जीभ व हनुवटी जन्मतःच होती मागील बाजूस
अमळनेर:-दुभंगलेले टाळू आणि जीभ व हनुवटी जन्मतःच मागील बाजूस,त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा अश्या परिस्थितीत अमळनेर येथील कस्तुरबा बाल रुग्णालयात दाखल झालेल्या दोन दिवसांच्या बाळास बालरोगतज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी आपल्या कौशल्याने जीवदान दिल्याने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.
पियरे रॉबिन्स सिंड्रोम असे या आजाराचे नाव असून हा आजार जेनेटिक व वातावरणाच्या प्रभावामुळे आईच्या पोटात (गर्भात) वाढ होत असताना होत असतो,यात जन्मानंतर बाळ दगाविण्याचे प्रमाण खूप जास्त असते.अनेक जन्मानंतर असे एक बाळ जनमास येते अशी माहिती डॉ.बाविस्कर यांनी दिली.
दरम्यान तालुक्यांतीलच एका महिलेची प्रसूती एका रुग्णालयात होऊन तिने कन्या रत्नास जन्म दिला.मात्र बाळास जन्मताच वरील प्रमाणे लक्षणे दिसून आल्याने आणि त्यास स्वरयंत्र व श्वसन नलिकेचा त्रास यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास धुळे येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे सदर बाळ पियरे रॉबिन्स सिंड्रोमने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले.सदर कुटुंबाला धुळे येथे ट्रीटमेंट करणे शक्य नसल्याने त्यांनी बाळाला अमळनेर येथे डॉ.बाविस्कर यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती बाळाची स्थिती पाहून समजावून सांगितले आणि पुढील ट्रीटमेंट साठी धुळे नेण्याचा सल्ला दिला. परंतु नातेवाईकांनी डॉक्टरांवर विश्वास दाखवून तेथेच करण्याची विनंती केली.त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची विनंती मान्य करत शर्थीचे प्रयत्न करीत उपचार सुरू केले, दंत चिकित्सक डॉ निशा जैन यांचा दुभंगलेल्या टाळूबाबत सल्ला घेतला व त्याप्रमाणे उपचार केलेत. अखेर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी बाळ नैसर्गिक रित्या श्वास घ्यायला लागून आईचे दूधही पिऊ लागले. आज सदर बाळ अत्यंत सुव्यवस्थित असून डॉ बाविस्कर त्याच्यासाठी देवदूत ठरल्याने नातलगांनी विशेष आभार व्यक्त केले.

