
कुऱ्हे शिवारात वीज पडून २० मेंढ्या ठार, सरकारने अन्नदात्या शेतकऱ्याला तातडीची मदत देण्याची मागणी…
अमळनेर : तालुक्यात १२ रोजी मुसळधार पाऊस झाला असून दोन दिवसात तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. राहिलेल्या पिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर चांदणी कुऱ्हे शिवारात वीज पडून २० मेंढ्या ठार झाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून तत्पर असलेल्या सरकारने अन्नदात्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
https://youtube.com/shorts/n7FWT4SNljs?si=SROzHZ21EmxNOst0
शनिवारी वावडे मंडळात ७२ मिमी तर मारवड मंडळात ६८ मिमी पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर अमळनेर मंडळात ५७ मिमी पाऊस , पातोंडा ४७ मिमी , नगाव ४० मिमी , अमळगाव ४० मिमी , भरवस ४८ मिमी , शिरूड १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी पातोंडा मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमळनेर मंडळात ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी टाकरखेडा कुऱ्हे शिवारादरम्यान वीज पडून धुळे येथील धनगराच्या सुमारे २० मेंढ्या ठार झाल्या आहेत. सुरेश भिला पाटील यांच्या शेताजवलीळ मोकळ्या जागेत गट नंबर १२२ मध्ये मेंढ्यांचा पाडाव होता. संजय शिवराम गोयकर रा धुळे, बकाबाई रामदास तिळे (मेहेरगाव ) यांच्या सुमारे २० मेंढ्या वीज पडून दगावल्या आहेत. मंडळाधिकारी गौरव शिरसाठ , तलाठी कुलदीप पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी आर बी गाडे (पातोंडा) ,एम आर शेख ( ढेकू) यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. १४ तारखेपर्यंत एकूण ९८४.८९ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात सरासरी ६७० मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा भरमसाठ पाऊस पडल्याने पावसाचे प्रमाण १४६ टक्क्यांवर गेले आहे.
शहरात देखील ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भुयारी गटार असलेल्या भागात नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे.वावडे परिसरात तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा मका शेतातून काढायला संधीच मिळाली नाही म्हणून मक्याच्या कणसालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे तोंडी आलेला घास हातातून गेला आहे. सरकारने गेल्या महिनाभरात जेव्हढी तत्परता देण्यासाठी दाखवली तेव्हढी आता दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.




