
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे किरकोळ वादातून शिवीगाळ करत एकाला दांडक्याने मारहाण केल्याने मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी (वय २८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ रोजी त्याची आई लीलाबाई ह्या काकू मंगल पारधी यांना पाहायला गेल्या असता फिर्यादीचा चुलत भाऊ सुभाष दिगंबर पारधी हा फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ का करतोय अशी विचारणा समाधान याने केली असता सुभाष याने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारले. त्यामुळे समाधान बेशुद्ध झाला, तो शुध्दीवर आल्यावर सुभाष याने शिवीगाळ करत तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी उपचार मेमो दिल्यानंतर समाधान याने उपचार घेवून मारवड पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




