
अमळनेर:- जुन्या ड्रेसिंग टेबल मधील सापडलेले पाच लाख रुपये मालकाला परत करण्याचा प्रामाणिकपणा रंगकामाच्या ठेकेदाराने दाखवला आहे.
दत्तात्रय अरुण पवार हे मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा यांच्याकडे रंगकाम ठेकेदार म्हणून काम करतात. आपल्या कामगारांच्या माध्यमातून ते घराची सजावट ,रंगकाम करतात. भालेराव नगर मधील पाटील गढी जवळ दिनेश वैद्य यांच्या घरी लग्न कार्य असल्याने दत्तात्रय पवार याना रंगकाम देण्यात आले. वैद्य यांच्या घरात ड्रेसिंग टेबल मध्ये पाच लाख रुपये ठेवलेले होते. रंगकामासाठी साहित्य हलवत असताना ड्रेसिंग टेबलचा पाय तुटला आणि त्यातून पाच लाख रुपये खाली पडले. दत्तात्रय पवार यांनी वैद्य यांना बोलावून पैसे त्यांच्या ताब्यात दिले व घरातील काही मौल्यवान वस्तू असतील तर बाजूला काढून ठेवा. घरात माणसे काम करीत आहेत उगीच गैरसमज नको म्हणून सूचना दिल्यात. विश्वास या शब्दावरून विश्वास उडालेल्या सध्याच्या जगात प्रामाणिक माणसे क्वचितच मिळतात. दत्तात्रय पवार यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रामाणिक भूमिकेबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.




