
२०१९ मध्ये भाजपात घेतला होता प्रवेश
अमळनेर:- भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांची हकालपट्टी करण्यात आली असून प्रदेश स्तरावरून याबाबत पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिरीष चौधरी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्याआधी त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र मागील निवडणुकीत पराभवाची चव चाखल्यानंतर यंदा त्यांनी पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. सदर मतदारसंघ युतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सुटली आहे. सहकारी पक्षाने अधिकृत उमेदवार दिला असताना अपक्ष अर्ज केला असल्याने भाजपाकडून शिरीष चौधरी यांनी बंडखोरी केल्याचे कारण देत पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयाने चौधरी यांना निश्चितच फटका बसणार आहे. मात्र सदरचे पत्र बनावट असल्याचे चौधरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.




