१५ व १६ रोजी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने राहणार गर्दी…
अमळनेर:- तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव ता. १५ कृतिका नक्षत्र पासून सुरु होत आहे. यंदा १५ व १६ असे दोन दिवस मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
पौर्णिमा व कृतिका नक्षत्र हा दुर्मिळ योग १५ रोजी रात्री ९:५५ पासून १६ तारखेच्या पहाटे २:५८ वाजेपर्यंत असून फक्त सहा तास आहे. मात्र हिवाळ्याचे दिवस व रात्र असल्याने वयोवृद्ध व महिला भाविकांना त्रास होऊ नये म्हणून १५ व १६ नोव्हेंबर असे दोन दिवस मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
हा योग वर्षातून एकदाच येत असल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. हा यात्रोत्सव बोरी नदी काठावर भरविला जातो. या बोरी नदीवर पाण्याचा साठवण बंधारा बांधण्यात आल्याने यावरून पडणारे पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील कार्तिक स्वामींच्या तीन मंदिरापैकी अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील एक मंदिर आहे. या यात्रोत्सवाचे संपूर्ण खान्देशात महत्व असल्याने दोन दिवस लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतील. दरम्यान मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकानी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.