लाखो भाविक घेणार दर्शन, परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड, गोवर्धन बोरगाव सह परिसराचे आराध्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथापैकी एक असलेल्या श्री कालभैरवनाथांचा यात्रोत्सवास दिनांक २२ पासून सुरूवात होणार असून २३ रोजी महाकाल भैरवनाथ कार्तिकी अष्टमीला मुख्य यात्रोत्सव आहे. महाप्रसादाचे सकाळी ९ पासून वाटप करण्यात येणार आहे. माळण नदी पात्रात यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठी भैरवनाथ मंदिर संस्थान व पोलीस प्रशासन यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सज्ज झाले आहे.
तालुक्यातीलच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराध्य दैवत असलेल्या भारतातील तीनच ठिकाणी स्वयंभू स्थान असलेले श्री कालभैरवनाथ मंदिराचा महिमा सर्वदूर असल्याने त्यातील माळण नदीकाठी असलेल्या स्वयंभू श्री काळभैरवनाथ मंदिराचा मारवड, गोवर्धन, बोरगावचे ग्रामस्थ सालाबादप्रमाणे कार्तिक अष्टमीला कालभैरव नाथांचा यात्रोत्सव साजरा करीत असतात. दरवर्षी धुमधडाक्यात यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होऊन दिवसभर महाप्रसाद वाटप होत असतो. वरील तिन्ही गावातीलच आबालवृद्ध दिवसरात्र सेवा देत असतात. यावेळी कालभैरव नाथांची रक्षा (धुनी) कपाळी लावून नवसपूर्तीसाठी विशेष गर्दी होते. २२ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य पालखी सोहळा मिरवणूक पार पडणार असून रात्री ९ पासून रात्रभर अखंड एकतारी भजनी मंडळ भजन करून भैरवनाथ जागर करण्यात येईल. तर दिनांक २३ रोजी मुख्य यात्रा महोत्सव निमित्त पहाटे ढोल वाजवून मंगल आरती तर ७:३० वाजता महायज्ञ पूजन करीत ध्वजारोहण तसेच सकाळी नऊ वाजेपासून महाप्रसादाचा भंडारा कार्यक्रम सुरू होईल. तर दिनांक २४ रोजी श्री स्वामी समर्थ भक्तांचे कुलदैवत मेळावा, व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भैरवनाथ अष्टमी निमित्त संपूर्ण खानदेशासह दुरवरील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आतापासूनच माळन नदीच्या पात्रात पाळणे, पालखे, विविध विक्रेते, खेळणे विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानांची रेलचेल सुरू झाली आहे. संपूर्ण देशात असलेल्या तीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील यात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येणार असून परिसरातील नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.