अमळनेर : काकांच्या अंत्ययात्रेला खांदा देऊन लगेच राष्ट्रीय कार्यास खांदा लावण्यास हजर राहून कर्तव्य निष्ठा दाखवणारे चोपड्याचे आधार पानपाटील या शिक्षकाने शासकीय कर्मचाऱ्यापुढे आदर्श निर्माण केला आहे.
चोपडा तालुक्यातील पांडुरंग सूर्यवंशी यांचे वडील मयत झाल्यावर ते निवडणूक कामाला हजर झाले तसेच चोपडा तालुक्यातीलच मालखेडा येथील रहिवासी असलेले व देवगड येथील जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक आधार पानपाटील यांचे सख्खे काका जगन्नाथ सेना पानपाटील वय ७० यांचे १७ रोजी निधन झाले. १८ रोजी सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा झाली. आधार पानपाटील काकांच्या अंत्ययात्रेत खांदेकरी झाले होते. ज्या घरात मृत्यू होतो त्या घरातील लोकांना गावाबाहेर जाता येत नाही. मात्र सर्व दुःख विसरून आधार पानपाटील लोकशाहीच्या राष्ट्रीय कार्यास खांदा लावायला हजर होऊन आपल्या सहकारी कर्मचारीना ‛आधार’ दिला आहे.
१९ रोजी अमळनेर तालुक्यात निवडणूक कामाला हजर झाले. त्यांना तालुक्यातील दहिवद मतदान केंद्र क्रमांक ९६ मिळाले आहे. सकाळी लवकर उठून त्यांनी मॉक पोल करून घेतले. स्वतःवर दुःख असताना सहकाऱ्यांना आधार देत २० रोजी निवडणूक मतदान पूर्ण करून पुन्हा ते दुसऱ्या दिवशी २१ रोजी ते पुन्हा काकांच्या उत्तरकार्याला हजर राहणार आहेत.
कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या आणि मनात कामाची भीती बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पांडुरंग सूर्यवंशी आणि आधार पानपाटील आदर्श ठरले आहेत.
दुःख विसरून निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देऊन आनंदाने प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतरही कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढून त्यांच्या मनातील भीती दूर झाली आहे.–नितीनकुमार मुंडावरे, निवडणूक निर्णय अधिकारी, विधानसभा अमळनेर