
अमळनेर :- सुरुवातील अत्यंत चुरशीची वाटणारी अमळनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक मंत्री अनिल पाटील यांनी एकहाती जिंकली असून वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अनिल पाटील हे तातडीने मुंबई रवाना झाले, पहाटेच त्यांनी ना. अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा मंत्री पदाच्या आशा बळावल्या आहेत.

अमळनेर मतदारसंघात एकूण ३ लाख ८ हजार २७२ मतदानापैकी २ लाख २ हजार २४६ मतदान झाले होते.२३ रोजी शहरातील टाकरखेडे रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मंत्री अनिल पाटील हे पहिल्याफेरी पासूनच आघाडीवर होते.दुपारी १ वाजता अंतिम निकाल जाहीर झाला.त्यानंतर शहरातील पैलाड नाक्यावरील चौफुलीपासून विजयी मिरवणुकीला सुरवात झाली.मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी खुल्या जिपमधून नागरिकांचे अभिनंदन स्वीकारले.
यावेळी शहरातील विविध चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले.जेसीबीतून गुलालाची उधळपट्टी करण्यात आली.डंपर मधून कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. दुपारी १ वाजता सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.यावेळी मिरवणुकीचे रूपांतर आभार सभेत झाले.
यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी खासदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील तसेच महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.
२३ रोजी शहरातील टाकरखेडे रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रशासनातर्फे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरवात करण्यात आली.एकूण २३ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली.१५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले होते.मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी काम पाहिले.पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
प्रतिक्रिया
जनतेने दाखवलेला विश्वास यापुढील काळात काम करण्यासाठी ऊर्जा देईल.महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे हे पर्व अविरतपणे सुरू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. – अनिल भाईदास पाटील, विजयी उमेदवार
प्रतिक्रिया…
पराभव हा क्षणभंगुर असतो,पण जनतेसाठी केलेला संघर्ष कायम राहतो.लागलेला निकाल अपक्षेप्रमाणे नसला तर समाजसेवेचा ध्यास अखंड सुरू राहील.
– शिरीष चौधरी, पराभूत उमेदवार
प्रतिक्रिया
जनतेने दिलेला कौल मान्य आहे.यापुढे देखील समाजसेवा करण्याचे पर्व सुरूच असेल.
डॉ.अनिल शिंदे, पराभूत उमेदवार
जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खाते मिळणार
गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची आहे आठवण
यंदाच्या निवडणुकीत अमळनेर येथे महायुतीचा मेळावा झाला असता त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल पाटील यांना जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढे चांगले खाते मिळू शकते असे भाकीत केले होते, अमळनेरच्या जनतेने आता त्यांना 33 हजारांचे मोठे मताधिक्य दिल्याने,मंत्री महाजन यांच्या वक्तव्याची आठवण अमळनेरकराना असून महायुती सरकार आता त्यांना कोणते खाते देणार?असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव आमदार असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.




