
सूक्ष्म नियोजनाने खेचून आणली विजयश्री, कार्यकर्त्यांनी विजयोस्तवाला केली सुरुवात…
अमळनेर:- सुरुवातीला चुरशीच्या वाटणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल पाटील यांनी सूक्ष्म नियोजन करत विजयश्री खेचून आणली असून कार्यकर्त्यांनी मोठ्या विजयोस्तवाला सुरुवात केली आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांना 109445 मते मिळाली. तर अपक्ष शिरीष चौधरी यांना 76010 मते मिळाल्याने अनिल पाटील 33 हजाराच्या लीडने विजयी झाले आहेत. डॉ. अनिल शिंदे मात्र 13798 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल पाटील, अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी, व महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे हे तिघे मातब्बर उमेदवार रिंगणात होते. २०१४ सारखा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा चौधरी समर्थकांची होती. मात्र योग्य वेळी साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर केल्याने मंत्री अनिल पाटील यांनी विजय मिळवल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला होता, मात्र पीकविमा आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर आरोप करून तालुक्यात नाराजी पसरवली होती. मात्र अनिल पाटील यांनी सूक्ष्म नियोजन करत विजयश्री खेचून आणली.
आरोपाच्या फैरींनी चौधरी गेले बॅकफुटवर,
मंत्री अनिल पाटील यांनी प्रबळ प्रतिस्पर्धी असलेल्या शिरीष चौधरी यांचा भांडाफोड करत सुतगिरणी विक्रीतील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर सादर करून त्यांना कोंडीत पकडले. निवडणूक संपली तरी त्याचा खुलासा चौधरी बंधूंना करता आला नाही. दुसऱ्या बाजूने राष्ट्रीय पातळीवरील नेत्या व सामाजिक कार्यकर्ते असलेल्या मेधा पाटकर यांनी अमळनेरच्या निवडणुकीत इंटरेस्ट घेत चौधरी बंधुवर मोठा आरोप करत मोठा धक्का दिला. शेतकऱ्यांची कोट्यवधीत फसवणूक केल्याचा आरोप मेधाताईंनी केल्यानंतर चौधरी हे पुरते बॅकफुटवर गेले. तसेच शेवटच्या दोन दिवसात वाटपात ही भेदभाव केल्याने त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.
अपुरी रसद आणि उशिरा उमेदवारीमुळे डॉ. शिंदे पडले पिछाडीवर,
अमळनेर मतदारसंघात उमेदवारी देताना महाविकास आघाडीने उशीर केल्याने त्याचा फटका उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना बसला. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी असणारी अपेक्षित रसद पक्षश्रेष्ठींनी पुरवली नाहीत. त्यामुळे मतदानापूर्वीच हिम्मत खचल्याने राज्यात सत्ताधारी पक्षाविषयी नाराजी असूनही मतदारसंघात महाविकास आघाडी मागे पडली.
मंत्री पाटील यांनी शरद पवारांचे विधान ठरवले खोटे,
‘ते यापुढे निवडून येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ’ असे उद्गार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी काढले होते. मात्र खुद्द मोठ्या पवारांच्या विधानाला खोटे ठरवत मंत्री पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. योग्य वेळी योग्य मोहरे वापरात विरोधात वक्तव्य करत शड्डू ठोकणाऱ्या माजी आमदार साहेबराव पाटील यांनाही जवळ केले. तसेच साडे चार वर्ष तालुक्यात न फिरकणाऱ्या चौधरी यांचे अनेक नेते व कार्यकर्ते यांना ही जवळ केले. शेवटच्या दोन दिवसात वाटपात ही हात आखडता न घेता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न केल्याने मतदारांनी ही मोठा प्रतिसाद त्यांना दिला. भाजपच्या सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी ही एकदिलाने काम केले. एकंदरीत सूक्ष्म नियोजन केल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.

