
दिवसभर भक्तांची मांदियाळी, विविध कार्यक्रमाची रेलचेल
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन मारवड बोरगाव येथील जागृत देवस्थान श्रीकालभैरवनाथांचा यात्रोत्सवात हजारो भाविकांनी श्रद्धास्थान असलेल्या कालभैरवनाथांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी व भंडाऱ्याचा महाप्रसादासाठी दिवसभर रीघ दिसून आली.

पहाटेची मंगलआरती आमदार अनिल पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील सपत्नीक केली. यात्रोत्सवात पाळणे, उपहारगृह व झुल्यांवर बालगोपालांची रात्री उशिरापर्यंत हौस पूर्ण झाली. माळण नदीकाठावर नदीच्या पात्रात पाण्यात पाय धुवून मारवड – बोरगाव -गोवर्धन परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभु काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी नदीपात्रात लाखो भाविकांची गर्दी उसळली. यात महिला वर्गाची व स्वामी समर्थ भक्तांची हजेरी लक्षणीय प्रमाणावर होती.
प्रारंभी पहाटे ५ वाजता धुप ध्यान आरती होऊन ६ वाजता ध्वजारोहण झाले. मान्यवर पाच जोडप्याचे हस्ते होमपूजन झाल्यावर सकाळी ९ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरु होता. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर भैरवनाथांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येथील काळभैरवनाथ स्वामी समर्थाचे कुलदैवत असल्याने संपूर्ण राज्यभरातील स्वामी समर्थांचे भक्तगणांची विशेष उपस्थिति होती. तर रात्री निरंकारी भजनी मंडळ दिवसभर भैरवनाथांचा जागर करून सेवा दिली.
कालभैरव नाथांच्या दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती
अमळनेरचे नवनिर्वाचित आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सकाळी सपत्नीक जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या समवेत पूजन करून दर्शन घेतले. कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज, खासदार आमदार स्मिता वाघ, शांतता कमिटीचे सदस्य वसंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील यांसह विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली. तसेच यावेळी भाविक भक्तांकडून बांधकामासाठी उदार हस्ते दान मिळाले. मारवड गोवर्धन बोरगाव ग्रामस्थांकडून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जिभाऊ पाटील ,हवालदार सुनील तेली , फिरोज बागवान , मुकेश साळुंखे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गोवर्धन व मारवड या दोन्ही ग्रामपंचायतींनी मुलभूत सुविधा पुरविल्या , बसेस एक तासाआड उपलब्ध असल्याने खाजगी वाहन धारकांनी नियमित शुल्क घेऊन भाविकांना मंदिर परिसरात सोडले ,यात्रोत्सव यशस्वीतेसाठी मंदिर संस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सलग तीन दिवस परिश्रम घेतले.
पाडळसरेत केसरी भैरवनाथ मंदिरावर अष्टमी जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई
पाडळसरेत केसरी भैरवनाथ मंदिरावर अष्टमी जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली होती , सरपंच शुभांगी पाटील व सचिन पाटील यांनी मंदिर परिसरात युवकांच्या माध्यमातून साफ़ सफाई करत मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे वावडे येथील पोलीस पाटील हभप डॉ दत्ता ठाकरे , शिरसाळे येथील पोलीस पाटील रामचंद्र चौधरी ,लोणसिमचे कांतीलाल पाटील ,पाडळसरे येथील पत्रकार वसंतराव पाटील ,उमाकांत पाटील , तनुजा पाटील ,सात्रीचे पोलीस पाटील विनोद बोरसे यांनी मंदिर परिसर स्वच्छता मोहीम हाती घेतली तर महिला पोलीस यांनी आकर्षक रांगोळी काढून शोभा वाढवली , सकाळी लोण खुर्दच्या पोलीस पाटील तनुजा शिंदे व उदय शिंदे यांनी सपत्नीक अभिषेक , पूजा आरती करून ध्वजारोहण करण्यात आले , औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील भरत वर्मा व उज्वला अग्रवाल यांनी नैवेद्य दाखवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे मानकरी होऊन प्रसाद वाटप करण्यात आला , मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था युवकांनी स्वस्य प्रेरणेने करून भैरवनाथ अष्टमी उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले




