
शेतकऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल श्याम अहिरे यांनी केली तक्रार
अमळनेर : शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत मोजल्यानंतर तो शेतकऱ्यालाच गावाबाहेर न्यावा लागतो त्याला लागणाऱ्या भुर्दंडाबद्दल श्याम अहिरे यांनी केलेल्या तक्रारींवर व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सभापती अशोक पाटील यांनी दिली.

सध्या अमळनेर बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी बाजार समितीत माल आणल्यावर लिलाव झाला की तोच माल शेतकरी स्वतः गावाबाहेर व्यापाऱ्यांच्या जीन मध्ये घेऊन जातात. आणि मालाची मोजणी देखील त्याच ठिकाणी केली जाते. त्यामुळे बाजार समितीच्या काटा फी चे नुकसान होत आहे. तर बाजार समितीत ३० रुपये प्रति क्विंटल फी असताना बाहेर व्यापारी त्यांच्या काट्यावर ४० रुपये क्विंटल फी घेतात. त्या काट्याची विश्वासार्हता नाही. तसेच शेतकऱ्यांना लांब अंतरावर ट्रॅक्टर ने माल पोहचवला जात असल्याने त्याचा इंधन खर्च होत आहे. अशी तक्रार श्याम अहिरे यांनी बाजारसमितीच्या वांधा समितीकडे केली होती. खाजगी जीन वर शेतकऱ्यांच्या मालाची रिस्क असते. शेतकर्यांचे नुकसान झाले तर त्याला शेतकरीच जबाबदार धरले जाते.
त्यावर बाजार समितीने बैठकीत चर्चा केली. बाजार समिती आवारात माल ठेवायला पुरेशी जागा नाही म्हणून ५ किमी च्या आवारात व्यापारी माल साठवतात असे सांगण्यात आले. आणि यामुळेच व्यापाऱ्यात स्पर्धा निर्माण होऊन जादा भाव मिळतो. मात्र तरीही माल बाहेर नेणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना भाडे देण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगण्यात आले. त्यावर श्याम अहिरे यांनी यावर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला.
तसेच यावेळी धार येथील सुभाष मन्साराम पाटील यांनीही यावेळी तक्रार केली की कापसावर हमाली आणि मापाई प्रतिक्विंटल १२ रुपये असताना मात्र १५ रुपये क्विंटल प्रमाणे घेतली गेली. त्यावर बाजार समितीने १२ रुपये पेक्षा जास्त दर लावल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले.
उपसभापती सुरेश पिरन पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांमुळेच बाजार समिती सुरू आहे. त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे अशा सूचना त्यांनी व्यापारी आणि कर्मचार्यांना दिल्यात.
यावेळी संचालक डॉ अशोक हिम्मत पाटील, प्रा सुभाष पाटील , नितीन पाटील , शरद पाटील , सचिव डॉ उन्मेष राठोड , सहसचिव सुनील पाटील , विजय पाटील , व्यापारी कपिल दलाल , विजय सदाशिव पाटील , सुधाकर संतोष पाटील , प्रशांत शिरसाठ ,रवींद्र शांताराम पाटील , जितेंद्र झवर हजर होते.




