
बारा गावातील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील बोरी नदीवरील फाफोरे गावाजवळील ब्रिटिशकालीन वळण बंधारा व त्यावरील पाटचारीच्या दुरुस्ती कामास सुरवात करण्याबाबत तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंतांना १२ गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. प्रशासनाने तात्काळ कामास सुरवात न केल्यास ग्रामस्थांनी २६ जानेवारी पासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील धार, मालपुर, फाफोरे,हिंगणे, अंतुर्ली, रंजाणे, अंबारे,खापरखेडा, करणखेडे, मारवड, डांगरी,माळीवाडा, तांबेपुरा बोरी नदीकाठावरील या गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की,२३ जुलै २०२४ रोजी च्या शासन अधिसूचनेनुसार तालुक्यातील फाफोरे येथील ब्रिटिश कालीन बंधारा व पुरपाटचारीच्या दुरुस्ती कामाला विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून १ कोटी ५२ लाख ९२ हजार ४१४ रुपये मंजूर झालेले आहेत. तरी या कामाला लवकरात लवकर सुरवात करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्यथा २६ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.निवेदनावर गणेश महादेव पवार तसेच १२ गावातील सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या सह्या आहेत.




