
अमळनेर : बनावट चेकचा वापर करून दुकानातील माल लुटण्याचा प्रयत्न दुकानदाराच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. दुकानदार घटनास्थळी वेळीच पोहचल्याने आरोपी मात्र पळून गेला.

याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील एक जण स्वामी समर्थ मंदिराजवळ श्रीराम पेंट्स दुकानांवर रंगांचे डबे घ्यायला गेला. माल पसंद पडल्यावर त्याने दुकानदाराला सांगितले की, मी चेक पाठवतो तुम्ही त्याच्याजवळ माल पातोंडयाला पाठवून द्या. संबंधित इसम बाहेर गेल्यावर त्याने एका रिक्षावाल्याला हाताशी धरून त्याच्याजवळ चेक देऊन सांगितले की, या दुकानावरून माल भरून पातोंडयाला घेऊन जा तेथे माझा भाऊ भाडे देईल. रिक्षावाला चेक घेऊन गेला व माल भरला. मात्र दुकानदार सतर्क होता. त्याने रिक्षावाल्याचा मोबाईल नंबर मागून घेतला. रिक्षात माल भरून गेल्यावर दुकानदार चेक असलेल्या एच डी एफ सी बँकेत गेला व या खात्यावर किती शिल्लक आहे असे विचारले असता त्यात रक्कम नव्हती. दुकानदार सावध झाला. त्याने रिक्षावाल्याला फोन लावला की आणखी दोन डबे टाकायचे आहेत तू देवळीला थांब. इकडे आरोपीने दुकानदाराला थांबवून ठेवण्यासाठी आणखी माल घ्यायला येतो असे सांगून दुकानांवर थांबायला सांगितले. दुकानदाराला अजून संशय आला तर तिकडे आरोपी रिक्षावाल्याला लवकर जायला सांगत होता. आरोपीने रस्त्यात दहिवद फाट्याजवळ त्याचा माणूस उभा करून ठेवला होता. रस्त्यात माल उतरवून घेण्याच्या त्याला सूचना होत्या. रिक्षा दहिवद फाट्याजवळ येताच तेथे थांबलेल्या इसमाने रिक्षा थांबवून रंगाचे डबे उतरवू लागला. तितक्यात दुकानदाराने रिक्षावाल्याला फोन लावला तू जिथे असेल तेथेच थांब माल कोणाला देऊ नका. रिक्षावाल्याला गडबड समजताच त्याने रंगाचे डबे उतरवणाऱ्याला विरोध केला. दहिवद फाट्याजवलीळ माणूस गडबड लक्षात येताच पळून गेला. दुकानदाराच्या सतर्कतेने तो वेळेवर पोहचल्याने नुकसान होण्यापासून बचावला. अशीच घटना किराणा दुकानदाराच्या बाबतीतही घडल्याचे वृत्त आहे.

