
ऊस व तूर पिकावर ड्रोनच्या सहाय्याने केली औषध फवारणी…
अमळनेर:- बदलत्या काळात काळानुरूप शेतकऱ्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्याने शेती करण्याचा कल दिसून येत असून सोशल मीडियाच्या साहाय्याने ग्रामीण भागातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. यातच तालुक्यातील मूडी बोदर्डे येथील शेतकऱ्याने व नावरा येथील योगेश पाटील यांच्या संलग्न असलेल्या कंपनीशी संपर्क साधत अत्याधुनिक ड्रोन आणून शेतीत चक्क ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केली आहे.

मूडी येथील युवा प्रयोगशील शेतकरी व ऊसाचे व्यापारी संतोष गुलाबराव चौधरी यांनी ड्रोनच्या सहाय्याने ऊस पिकावर फवारणी केली. तुरीवर सुध्दा मोठया प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावरही कीटक नाशकाची फवारणी केली.
ऊस हा तोडणी इतका उंच झाल्यावर ऊस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला होता. ऊसावर पांढरा लोकरीमावा मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. परंतु फवारणी करणे शक्य नव्हते. उसाच्या पानांना बारीक काटेरी लव असते त्यात अंग ओरबडले जाते. त्यामुळे मजूर मिळतं नसल्याने उंच उसावर फवारणी करणे अशक्य होते.यावर उपाय म्हणुन सोशल मीडियाचा उपयोग करत संतोष चौधरी यांनी इफको व योगेश पाटील यांना विनंती केली व ड्रोन भाड्याने मागवत आपल्या ऊस पिकावर यशस्वी फवारणी केली. हा प्रयोग बघून समाधान चौधरी, गणेश बडगुजर, दिनेश पाटील, गुलाबराव पाटील, लोटन राजपुत, संजय पाटील बाळासाहेब पाटील या अन्य शेतकऱ्यांनी ही फवारणी केली यामुळें शेतकऱ्यांनी अगदी कमी वेळेत योग्य फवारणी करून संपुर्ण गावातली शेतकऱ्यांनी सुद्धा हा प्रयोग राबविला.
या ड्रोन फवारणीमुळे वेळ, पाणी व औषधाची बचत…
८ ते १० लिटर पाण्यामध्ये १ एकरची फवारणी शक्य होते. संपुर्ण पिकांवर समांतर फवारणी १ एकरसाठी ५ ते ७ मिनीटांचा वेळ लागतो. पारंपारिक फवारणी पद्धतीपेक्षा अचूक फवारणी होते. मनुष्याला कीटकनाशकांच्या संसर्गापासून दूर ठेवते आणि विषबाधा तसेच उष्माघातापासून प्रतिबंधित करते. निश्चित स्थिती व निश्चित दिशा देऊन फवारणी करता येते, त्यामुळे पाणी व मातीतील प्रदूषण कमी होते. मोठ्या प्रमाणात ऑटोमिझेशन, रासायनिक धुके पिकाच्या स्तरावर दाबले जाऊ शकतात.
औषध आणि पाण्याची बचत – अल्ट्रा लो व्हॅल्यूम फवारणी तंत्रज्ञान वापरता येते, पाण्याचा वापर पारंपारिक फवारणीच्या १० टक्के आहे.
प्रतिक्रिया…
ड्रोनची संकल्पना सोशल मीडियावर भावली व उसावर फवारणी करण्याचा निर्णय घेतला व प्रयोग यशस्वी झाला. यामुळें वेळ पाणी व पैशांची बचत झाली. व रोगावर प्रभावी इलाज करता आला.
– संतोष चौधरी, शेतकरी मूडी बोदर्डे.




