अमळनेर:- तालुक्यातील रूट चळवळ प्रणित मारवड विकास मंच या संस्थेची दिल्ली येथील शिव नादार युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली असून युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी तीन महिन्यांसाठी संस्थेसोबत काम करणार आहे.
रूट चळवळीतून तालुक्यातील बहुसंख्य गावात विकास मंच स्थापन करण्यात आली असून त्यातून गावागावात सिंचन विषयक व इतर समाजोपयोगी कामे सुरू आहेत. एचसीएल या प्रसिद्ध कॉम्प्युटर कंपनीद्वारे स्थापित भारतातील नामांकित विद्यापीठाशी जोडलेल्या गेल्याने या रूट चळवळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिव नादर युनिव्हर्सिटी, दिल्ली हे भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ असून HCL या प्रसिद्ध संगणक बनविणाऱ्या कंपनीचे संस्थापक श्री शिव नादर यांनी स्थापन केलेली आहे. भारतात इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनेन्स (महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था) असा असा दर्जा मिळालेल्या काही अत्यंत मोजक्या संस्थांपैकी ही एक संस्था आहे. या विद्यापीठाने तीन वर्षापूर्वी एमए (रुरल मॅनेजमेंट) हा एक नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केलेला असून त्याचा कालावधी दोन वर्ष आहे. त्यापैकी तीन महिने प्रत्येक विद्यार्थ्याला एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्था सोबत जोडले जाते. या तीन महिन्यात सदर संस्थेने केलेल्या कामाचा अभ्यास करणे व त्याचबरोबर ती संस्था देईल अशा काही प्रोजेक्टवर काम करणे अपेक्षित असते. अभ्यासक्रमादरम्यान त्या विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक सदर विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर त्याच्या कामांचा आढावा देखील घेतात. तीन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर सदर विद्यार्थ्याला विद्यापीठात जाऊन सदर संस्थेच्या कामाविषयी व स्वतः केलेल्या प्रोजेक्ट विषयी सादरीकरण करायचे असते. विद्यार्थ्यांना फिल्ड प्रशिक्षण देण्यासाठी अशा स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यासाठी काही विशिष्ट निकष लावले जातात. सदर संस्थेचे काम बघितले जावून सुमारे तीन मीटिंग होतात व त्यानंतर त्यांना योग्य वाटले तरच ते विद्यापीठाशी संलग्न होणाऱ्या अशा संस्थांची निवड करतात. त्यातील एक संस्था म्हणून तालुक्यातील मारवड विकास मंचाची निवड करण्यात आलेली आहे. या काळात या अभ्यासक्रमाचा एक विद्यार्थी मंचद्वारे दिलेल्या प्रोजेक्टवर तीन महिने मारवडला राहून काम करेल आणि तो त्याच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून युनिव्हर्सिटी मध्ये सादर करेल. ७ जानेवारी पासून पुढे तीन महिने संबंधित विद्यार्थी मारवडला राहील. त्यामुळे रूट चळवळीतील व मारवड विकास मंचातील सर्व मावळ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रिया…
देशातील एका प्रसिद्ध विद्यापीठाने आपल्या कामाची दखल घेणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे. मात्र याचे सर्व श्रेय गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्वसामान्य मावळ्यांना जाते. यातून इतर अनेक गावांमध्ये सुद्धा विकास मंच स्थापन व्हावेत आणि महात्मा गांधींचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे हीच खरी या यशाची उपलब्धी असेल.
– श्री. संदिपकुमार साळुंखे, आयकर आयुक्त, नागपूर विभाग