
फक्त अमळनेरलाच केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
अमळनेर : जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा कापूस खरेदी सीसीआय केंद्रे सुरू करण्यात आली असून फक्त अमळनेरलाच केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अमळनेर वर झालेला अन्याय दूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तर सुरुवातीला बाजार समितीत आणि जीन मध्ये देखील मका खरेदी सुरू असल्याने प्रतिसाद मिळाला नसल्याचे कापूस महामंडळातर्फे सांगण्यात आले.

अमळनेर तालुका कापूस उत्पादनात जळगाव जिल्ह्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यात ११ केंद्रांवर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. शासकीय खरेदी केंद्रांवर बाजार भावापेक्षा ५००ते १ हजार रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. मात्र अमळनेरला केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ,उपसभापती आणि संचालकांनी मागणी करूनही केंद्र सुरू झालेले नाही. केंद्र सुरू करण्यासाठी १९ रोजी जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी याना निवेदन देऊन मागणी करण्यात येणार आहे. तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
गेल्यावेळी जिनर्स असोसिएशन ने अमळनेर ऐवजी पारोळा येथे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच आमचे प्रतिनिधी जेव्हा केंद्र सुरू करण्याबाबत प्रत्यक्ष आले तेव्हा बाजारसमितीत मका खरेदीला प्राधान्य दिले. कापूस खरेदीबाबत बाजारसमितीने प्रतिसाद दिला नाही. तरीदेखील अमळनेर ला केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत- स्वप्नील दडमल ,उपमहाप्रबंधक कापूस महामंडळ , छत्रपती संभाजीनगर




