
अमळनेर:- शहरातील पिंपळे रोडवरील ग. स. सोसायटीसमोरील सार्वजनिक जागेवर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २२ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे.

तालुक्यातील पिंगळवाडे येथील सखाराम नामदेव पाटील (वय ६०) हे २२ रोजी हळदीच्या कार्यक्रमासाठी शहरातील जोशीपुरा भागात आले होते. त्यांची २० हजार किमतीची हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी (क्रमांक एमएच १९ बीपी ५०४२) ही ग.स. पतपेढीसमोर रोडवर लावली होती. रात्री ९:३० वाजता त्यांचा मुलगा गाडीच्या डिकीत स्वेटर ठेवण्यासाठी आला तेव्हा गाडी सुस्थितीत होती. त्यानंतर त्यांच्या गावातील तरुण त्याठिकाणी गेला असता दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे फिर्यादी व नातेवाईकांनी शहरात शोध घेतला मात्र दुचाकीचा शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




