
अमळनेर:- तालुक्यातील एकतास येथील झालेल्या वादातून पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ३ रोजी घडली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून त्यानुसार ३ रोजी सकाळी नऊ वाजता फिर्यादी महिला गच्चीवर कपडे टाकायला गेली होती. व तिची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या लहान भावाला झोपाळ्यात झोपवून झोका देत होती. मुलीचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी महिला घरात आली असता गावातील भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे हा झोक्याजवळ उभा दिसून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेल्याने महिलेने आपल्या मुलीला हकीकत विचारली असता भाऊसाहेब याने घरात येऊन माझी पँट काढली व पूर्ण कपडे न काढल्यास तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी दिल्याने मुलीने ओरडल्याचे सांगितले. ते ऐकून फिर्यादी महिला आरोपीच्या घरी गेली असता भाऊसाहेब याची आई उषाबाई अशोक बोरसे हिने काहीही ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही आमच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीत ३५ जणांची नावे टाकली आहेत, ती कमी न केल्यास आम्ही असेच करत राहू अशी धमकी फिर्यादी महिलेला दिली. सदर महिलेचे पती घरी नसल्याने तिने ४ रोजी मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.




