
अमळनेर : जळगाव जिल्ह्यात अपार आयडी तयार करण्याचे प्रमाण अजूनही ७८.७२ टक्के असून अमळनेर तालुक्याचे प्रमाण ७४.८७ टक्के आहे. अपार आयडीचे काम प्रलंबित असणाऱ्या ४६ शाळांना गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

२०२४ वर्ष संपून २०२५ सुरू झाले आहे. अमळनेर तालुक्यात एकूण २६२ शाळा असून पूर्वप्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या ३० च्या ३० विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहेत. प्राथमिक शाळेच्या १९ हजार ८८८ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ५९१ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहे. उच्च प्राथमिक शाळेच्या १४ हजार ९५ पैकी १० हजार ४८५ , माध्यमिक शाळेच्या ९ हजार ३८८ पैकी ६ हजार ७३४ विद्यार्थ्यांचे तर उच्च माध्यमिक शाळांच्या ६ हजार ३४७ पैकी ४ हजार ४०६ विद्यार्थ्यांचे म्हणजे एकूण ४९ हजार ७४८ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार २४६ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. उर्वरित शाळाना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात ३३७८ शाळा असून ८ लाख १० हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ३८ हजार १९० विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत.
ग्रामीण भागात अपार आयडी साठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पालकांची नावे, आडनावे बदल, स्पेलिंग चुका येत असल्याने अपार आयडी तयार होत नाहीत. आधार दुरुस्तीला जन्मतारखेचा दाखला ही मोठी अडचण येत आहे.




