अमळनेर : शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी तथा बिल्डर महेंद्र पाटील यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. ही घटना ७ रोजी पहाटे तीनच्या सुमारास तालुक्यातील जानवे येथे घडली. यात महेंद्र पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील, सासू निर्मला पाटील या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. महेंद्र पाटील, त्यांचे जावई डॉ. चेतन पाटील, लक्षिता पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी व बिल्डर महेंद्र पाटील उर्फ महेंद्रकाका हे ६ रोजी कुटुंबियांसह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. रात्री अकराला ते दर्शन घेऊन परत येत असताना पहाटे तीनच्या सुमारास चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (एमएच 54 बी 7000) हे वाहन एका गेटवर जोरदार आदळले. यात महेंद्र पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील (वय ४२), त्यांच्या सासू निर्मला प्रताप पाटील (वय ७१) यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर महेंद्र पाटील यांचे जावई सिद्धिविनायक बालरुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन पाटील, त्यांच्या पत्नी लक्षिता पाटील व महेंद्र पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. डॉ. चेतन पाटील यांचा एक वर्षाचा मुलगा विराट सुखरूप असून, त्यास कुठलीही दुखापत झाली नाही. अपघात घडल्यानंतर डॉ. चेतन पाटील यांनी अमळनेर येथील त्यांचे मित्र बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल बडगुजर यांना घटनेची माहिती दिली. डॉ. विशाल बडगुजर यांनी व महेंद्र पाटील यांच्या निकटवर्तीय यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. जानवे येथूनच रुग्णवाहिकेने जखमींना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तातडीने मदत मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी विद्या पाटील व निर्मला पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले.