
अमळनेर : तालुक्यातील पिंपळी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या पडक्या खोलीत दहा फुटी अजगर सापडल्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सर्पमित्राच्या मदतीने अजगराला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
पिंपळी येथील जिप शाळेच्या मालकीचे दोन बिघे शेत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. शाळा खोल्यांच्या बाजूला मोडकी खोली असून त्याठिकाणी भंगार व तुटके साहित्य ठेवलेले आहे. १७ रोजी दुपारी मुलांना खेळताना त्या खोलीत पत्र्यामध्ये आवाज येत असल्याने त्यांचे तिकडे लक्ष वेधले गेले. मोठा अजगर दिसताच मुले घाबरली ,शिक्षकांना कळताच त्यांनी तातडीने अमळगाव येथील सर्पमित्र निखिल महाले याना बोलावले. मात्र अजगर वरती पत्रा आणि लाकडी सरा यात अडकलेला होता. शिक्षक भगवान पाटील, किरण पवार , सुरेखा पवार , उज्वला चव्हाण यांनी मदत करून स्टूल वर उभे करून मोठ्या प्रयत्नाने अजगराला पकडले. सर्पमित्राच्या हातात अजगराला पाहून मुलांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडत त्याचे जवळून निरीक्षण केले. नंतर अजगराला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.




