
अमळनेर : चोपडा व अमळनेर तालुक्याच्या दरम्यान तापी नदीवर मातीचा सेतू उभारणाऱ्या वाळू चोरणाऱ्यांचे मनसुबे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी उधळून लावले असून जेसीबी मशीनच्या साहाय्याने सेतू उध्वस्त करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वाळू चोरट्यानी चोपडा तालुक्यातील अनवर्दे व अमळनेर तालुक्यातील खापरखेडा गंगापूरी याना जोडणारा मातीचा सेतू तापी नदीवर बांधून नदी पात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात उपसा सुरू केला होता. सेतू उभारण्यासाठी कमीत कमी आठ दिवस तरी लागले असावेत इतक्या जाड मातीचा थर लावण्यात आला होता. तापीतील पाणी अडून बांध फुटू नये म्हणून पाणी वाहण्यासाठी पद्धतशीरपणे पाईप टाकून ठेवले होते. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.
एवढा मोठा मातीचा सेतू उभारण्यात आला तोपर्यंत ही बाब कोतवाल ,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, गावकरी , तापी महामंडळाचे अधिकारी यांना निदर्शनास कशी आली नाही. बिनधास्तपणे गौण खनिज चोरी केली जात होती.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तलाठी अनिल पवार,त्यांच्यासोबत मठगव्हान , हातेड खुर्द ,हातेड बुद्रुक , बुधगाव ,घाडवेल, घोडेगाव , मोहिदे ,वढोदा, विटनेर येथील मंडळाधिकारी , तलाठी , कोतवाल यांनी संयुक्त कारवाई करत जेसीबी मशीनच्या सहाय्याने मातीचा सेतू तोडून टाकला त्यामुळे वाळू चोरांचे डंपर व ट्रॅक्टर नदी पात्रातून जाऊ शकणार नाहीत.
दरम्यान वाळू चोरटे पुन्हा नव्याने सेतू बांधून पुन्हा मोठी चोरी करू शकता म्हणून यावर नियंत्रण ठेवले पाहिजे अशी मागणी होत आहे.
अनवर्दे व गंगापूरी दरम्यान तापी नदीत मातीचा मोठा बांध बांधून त्याचा उपयोग नदी पात्रातील वाळू चोरीसाठी केला जात असल्याची माहिती मिळताच तो उध्वस्त करण्यात आला असून आता विशेष महसूल पथकांच्या माध्यमातून वाळू चोरांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. – नितीनकुमार मुंडावरे ,उपविभागीय अधिकारी ,अमळनेर




