
अमळनेर – तालुक्यातील एकमेव तालुका अ वर्ग असलेले तसेच ऐतिहासिक 153 वर्ष जुने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या सन 2018 ते 2020 या दोन वर्षाकरिता कार्यकारी मंडळाची सभासदांमधून निवडणूक होऊन निवड करण्यात आली होती. त्यानंतर या कार्यकारी मंडळाची 2020 मध्ये मुदत संपलेली असताना देखील आज पावतो या कार्यकारी मंडळाने जनरल मीटिंग घेऊन निवडणूक कार्यक्रम न लावता बेकायदेशीररित्या आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेऊन वाचनालयाचा कारभार करीत आहेत.

सन 1872 मध्ये स्थापन असलेली व्हिक्टोरिया जुबिली लायब्ररी कालांतराने 1972 ला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय असे नामकरण करण्यात आले. आज रोजी वाचनालयाचे 300 सभासद व 450 आजीवन सभासद असून वाचनालयात कादंबरी, कथा, संकीर्ण, इतिहास, शास्त्रीय, देणगी ग्रंथ,अध्यात्मिक, नाटक, स्पर्धा परीक्षा पुस्तके अशी 40866 एकूण पुस्तके असून त्याचबरोबर 50 मासिके व दररोज 18 वृत्तपत्रे सभासदांसाठी उपलब्ध असतात. तसेच तालुका अ वर्ग वाचनालय असल्याने शासनाकडून दरवर्षी साडेसहा लाखाचे अनुदान वाचनालयास प्राप्त होऊन देखील कार्यकारी मंडळाकडून साडेचार वर्षापासून व्याख्यानमाला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत नसल्याने सभासदांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून आता तरी कार्यकारी मंडळाने जनरल मीटिंग घेऊन निवडणूक कार्यक्रम लावण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी वाचनालयाच्या सभासदांमधून होऊ लागली आहे.
प्रतिक्रिया
या कार्यकारी मंडळाची 22/07/2020 रोजी मुदत संपलेली असताना देखील हे कार्यकारी मंडळ बेकायदेशीररित्या साडेचार वर्षापासून शासकीय अनुदान खर्च करत आहेत. तसेच जनरल मीटिंग घेऊन निवडणूक कार्यक्रम न लावता सभासदांना मतदानापासून वंचित ठेवत आहेत. त्याचबरोबर आम्ही सभासदांनी वेळोवेळी निवडणूक घेण्यासंदर्भात लेखी व तोंडी तक्रार करून देखील कार्यकारी मंडळ गांभीर्याने दखल घेत नाही.- आत्माराम चौधरी, माजी अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर
प्रतिक्रिया
वाचनालयात निवडणूक घेण्याबाबत व शासकीय अनुदान खर्चाबाबत माहिती अधिकार 2005 अनन्वे अर्ज केला असता अपिलीय सुनावणी होऊन देखील आजपर्यंत कुठली माहिती कार्यकारी मंडळांनी दिलेली नाही. ग्रंथपालांकडे माहिती मागितली असता संस्थेचे दप्तर कार्यकारी मंडळाकडे असल्याकारणाने आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. असे उत्तर दिले जाते. – विलास पाटील ,सभासद, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर
प्रतिक्रिया
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने वार्षिक जनरल मीटिंग घेऊन सभासदांच्या सर्वानुमते निवडणूक कार्यक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून प्रथमतः मतदारांची प्रारूप यादी बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येईल.
दिलीप सोनवणे,अध्यक्ष,पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर





