
अमळनेर :- तालुक्यातील शिरुड येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामातील दिरंगाईची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून ठेकेदारावर कारवाई न केल्यास २६ जानेवारी पासून साखळी उपोषणाचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

शिरूड येथे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत २०२१ साली पाणीपुरवठा योजना मंजूर झाली १ जानेवारी २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता देखील या कामाला मिळाली.मात्र आजपावेतो काम पूर्ण करण्यात आले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.काम १०० टक्के पूर्ण न होताच परीक्षण अहवाल कागदावर दाखवून जळगाव येथील अनुपम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराला जवळपास ९३ लाखाचे बिल अदा करण्यात आलेलं आहे.
या योजनेबाबत ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समितीची कुठलीही बैठक अथवा माहिती देण्यात आलेली नाही.तसेच योजेनेसाठी लागणारे पंप हाऊस,पंपिंग मशिनरी बनावट दाखवून बिले काढून घेण्यात आलेली आहेत.
योजना मंजुरीनंतर पुढील ११ महिन्यात योजनेचे पाणी गावाला मिळणे गरजेचे असताना देखील ३ वर्ष झाली तरी योजना पूर्णत्वास आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सदर ठेकेदाराने खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यवधीची बिले काढून घेतली असून त्याच्यावर तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.
मागील काही वर्षांची भीषण पाणी टंचाई पाहता २०२५ मधील उन्हाळ्यासाठी ही योजना पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत अन्यथा २६ जानेवारी पासून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ गटविकास अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर सरपंच गोविंदा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अलकाबाई पाटील,अनिता पाटील, अफसानबी खाटीक,चंद्रकला पाटील,दिलीप रतन पाटील,अमीन खाटीक,यशवंत बैसाने,दिपाली पाटील,सागर पाटील, सुरेखा पाटील आदींच्या सह्या आहेत.





