
डीपीजवळ फ्युज बॉक्सही उघडे असल्यामुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका…
अमळनेर– वीज वितरण कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र अमळनेर शहरासह तालुक्यातील अनेक भागात दिसून येत आहे. शहरातील न्यू प्लॉट भागात असलेल्या वीज वितरण कंपनीचा विद्युत रोहित्र जवळील फ्युज बॉक्स नेहमी उघडा असतो. या ठिकाणाहून शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात अनेक ठिकाणी विजेच्या वाहिन्या लोंबकळल्या आहेत. तसेच दोन विद्युत खांबातील अंतर जास्त असल्याकारणाने व काही ठिकाणी वाहिन्या जीर्ण झाल्याने तुटण्याचा धोका आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांच्या मधोमध असलेले व वाकलेले विद्युत खांब वाहनधारकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करतात.अशा वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांचे व प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. एखादी आकस्मित घटना घडल्यास जबाबदार कोण असेल? हा प्रकार नुसता एखाद्या भागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरात दिसून येत आहे. शहरात सर्वत्र रस्त्या लगत असलेले विद्युत रोहित्रा जवळील फ्युज बॉक्स खुल्या अवस्थेत असल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा गुरांचा स्पर्श होण्याची दाट शक्यता आहे.
अनेकदा स्थानिक नागरिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या समस्या कळविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यानंतर कार्यालयीन वेळेत अभियंते, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. विजबिल वसुलीसाठी बाहेर गेल्याचे त्यांना सांगण्यात येते. तसेच मोबाईल वरून संपर्क केला असता आपल्या भागातील वायरमनला व खाजगी ठेकेदाराला उपायोजना करण्याचे सांगितले असल्याची सोईस्कर उत्तरे अभियंते देऊन आपली जबाबदारी झटकून मुक्त होतात. तसेच शहर अभियंताकडून वीज कंपनीच्या व्यावसायिक ग्राहकांच्या खाजगी कामासाठी सामान्य ग्राहकांना शनिवार रोजी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सकाळी तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित केला जातो. ज्याप्रमाणे एखाद्या महिन्यात जर का वीज बिल थकीत असल्यास अधिकारी घरापर्यंत पोहोचत असतात. आणि वीज पुरवठा खंडित करू असे ग्राहकांना बजावत असतात. मात्र या धोकेदायक विद्युत रोहित्र, उघडे फ्युज बॉक्स,लोंबकळणार्या विजेच्या वाहिन्या या सुधारण्याकडे व इतर उपाययोजना करण्याकडे कुणी लक्ष का देत नाही? तसेच अभियंते व कर्मचारी वेळीच का धावून येत नाही? का एखादी आकस्मित घटना घडण्याची वाट पाहत असतात. असे अनेक प्रश्न नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना भेडसावत आहेत. वीज कंपनीने लवकर उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया 1) आमच्या कॉलनी भागात विजेच्या वाहिन्या लोंबकळल्या आहेत.वाहिन्यांमध्ये वारंवार शॉर्टसर्किट होण्याची घटना घडून आगीच्या ठिणग्या उडतात. त्यामुळे वित्तहानीचा धोका आहे.मात्र वेळोवेळी वीज कंपनी कार्यालयात तक्रार देऊन देखील या विषयाकडे शहर अभियंते लक्ष देत नाही. वीज कंपनीने जास्त वर्दळ असलेल्या भागातील विजेच्या वाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता आहे.
उमेश देविदास महाजन, नागरिक, सुरभी कॉलनी,अमळनेर
प्रतिक्रिया 2) देखभाल दुरुस्तीचा वार्षिक करार संपलेला असून नवीन वार्षिक करारासाठी ई-निविदा प्रक्रिया चालू आहे. शहरातील धोकेदायक विद्युत रोहित्र, उघडे फ्युज बॉक्स,लोंबकळणार्या विजेच्या वाहिन्या व इतर अत्यावश्यक कामांच्या उपयोजना करण्यासाठी ई- निविदेतील सर्व अटी व शर्ती पात्र असलेल्या मोठ्या खाजगी ठेकेदाराला सूचना करण्यात आलेली आहे. लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून उपायोजना करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
टी. एच. नेमाडे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता,म. रा.वि.वि.कं. मर्यादित अमळनेर एक उपविभाग




