
शेकडो क्रिकेट प्रेमींनी मोठ्या डिजिटल स्क्रीनवर घेतला चॅम्पियन ट्रॉफी अंतिम सामन्याचा आनंद,महिलाही थिरकल्या विजयानंतर
अमळनेर -येथील नगरपरिषद मालकीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा तालुक्यात सर्वाधिक मोठा विजयोत्सव साजरा झाला.याठिकाणी महिला भगिनींसह शेकडो क्रिकेट प्रेमिनी हिरव्यागार लॉन्स वर मोठ्या डिजिटल स्क्रीनवर भारत न्यूझीलंड दरम्यान झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी अंतिम सामन्याचा एकत्र पाहण्याचा आनंद घेतला.विशेष म्हणजे महिला भगिनी देखील विजयानंतर चांगल्याच थिरकताना दिसुन आल्या.

हिंदू, बोहरी,मुस्लिम,जैन,सिंधी,पंजाबी,मराठा व ओबीसी अशा विविध समाज बांधवांनी एकत्रित येऊन हा सामना पाहिल्याने सामाजिक एकात्मतेचा संदेश देखील यातून मिळाला.छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप च्या वतिने उद्यानात मोठ्या डिजिटल स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती तर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी तथा मोहन कृषी उद्योग चे संचालक गोविंद अग्रवाल यांच्या अनमोल सहकार्याने संपूर्ण उत्कृष्ठ नियोजन करण्यात आले होते, याशिवाय अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर,अंबिका स्टुडिओचे महेंद्र पाटील, कृष्णा प्रॉव्हिजन चे प्रविण पारेख, सैरभ केरर्टर्सचे सौरभकुमार जैन,कल्पराज रेस्टॉरंट चे रोहन आठवले यांनीही अनमोल सहकार्य केले. याठिकाणी उत्तम बैठक व्यवस्था असल्याने संपूर्ण शहरातून क्रिकेट शौकीन दाखल झाले होते, यात जेष्ठ श्रेष्ठ नागरिक,विद्यार्थी,युवक,बाल गोपालांसह महिला व युवतींचा समावेश होता,रसिक दुपारी अडीच वाजेपासून ठिय्या मांडून होते.महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली होती,भारताच्या गोलंदाजीत पहिल्या विनिंग मध्ये व्हीकेट पडल्यानंतर वाजंत्रीच्या तालावर प्रचंड जल्लोष होत होता. सायंकाळी दुसऱ्या विनिंग मध्ये भारताची फलंदाजी सुरू असताना भारतीय फलंदाजांच्या तुफान फटकेबाजी वर प्रचंड जल्लोष होत गेला,दरम्यानच्या काळात थोडी धाकधूक वाढल्याने थोडी शांतता ही झाली होती मात्र पुन्हा फटकेबाजी सुरू होऊन भारताचे पारडे जड झाल्यानंतर पुन्हा जल्लोष सुरू झाला.यावेळी गावात घराघरात टीव्ही समोर बसलेली मंडळी देखील जल्लोष करावा म्हणून उद्यानात सहपरिवार दाखल झाली, आणि शेवटी विजयी चौकार मारताच ढोल ताश्याच्या गजरात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयोत्सव सुरू झाला.सारेच जण विजयाच्या आनंदात बेधुंद होऊन नाचत होते.भारतीय संघ व भारताचा जोरदार जयघोषही करण्यात आला.एकंदरीत आनंदोत्सवात सामाजिक एकात्मतेचे दर्शनही यानिमित्ताने घडून आले.
उपस्थित साऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप तर्फे भोजनाचा आस्वाद देण्यात आला. या आयोजनाचे साऱ्यांनी विशेष कौतुक केले.पोलीस व होमगार्ड बांधवानी विशेष बंदोबस्त ठेवला.माजी प्राचार्य डॉ ए जी सराफ, प्रकाशचंद पारेख,खा शि मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र जैन,माजी अध्यक्ष विवेकानंद भांडारकर, प्रीतपालसिंग बग्गा,विरेंद्र वाधवानी,रघुनाथ पाटील,संतोष पाटील,प्रेम शाह,पर्यंककुमार पटेल यासह अनेक जेष्ठ श्रेष्ठ मंडळींनी सामन्याचा आनंद घेतला. संजय चौधरी,चेतन राजपुत यांच्या नियोजनात ग्रुप सदस्यांनी परिश्रम घेतले.
सर्वाना एकत्रित आणण्याचा आनंददायी उपक्रम
भारत न्यूझीलंड अंतिम मेगा सामना निसर्गरम्य वातावरणात मोठ्या स्क्रीन वर पाहण्याचा आनंद तर साऱ्यांनी घेतलाच यासोबतच सर्व समाज बांधवानी यानिमित्ताने एकत्र येऊन विजयोत्सव साजरा केल्याने सामाजिक एकात्मतेचा चांगला संदेश समाजाला मिळाला.याचे संपूर्ण श्रेय आमच्या छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपला जाते. – गोविंद अग्रवाल(उद्योजक)
मोहन कृषी उद्योग,अमळनेर




