
५१ कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर , इतरत्र हलवण्यासाठी तारांबळ
अमळनेर : पर्यायी घरे देऊनही अनेक वर्षांपासून असलेले गांधीनगर भागातील अतिक्रमणावर अखेर नगरपालिकेने हातोडा चालवला. तब्बल ५१ कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले होते.

अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या पूर्वेला असलेल्या रस्त्याची रुंदी अतिक्रमणाने व्यापली होती. आधी साध्या झोपड्या होत्या नंतर पक्की दुकाने ,घरे ,दोन मजली इमारती उभ्या केल्या होत्या. त्यात अवैध व्यवसायसह इतर दुकाने देखील थाटण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. नगरपालिकेने या अतिक्रमण धारकांना टाकरखेडा रस्त्यावर म्हाडा ची घरे दिली होती. त्याचाही ताबा घेऊन अतिक्रमण धारकांनी गांधीनगर भागातील घरे भाड्याने दिली होती.
१० रोजी सकाळी १० वाजता बसस्थानकशेजारील गांधीनगर भागातील अतिक्रमण काढायला जेसीबी मशीन हजर होताच तेथील रहिवासी आपल्या मुलाबाळांसह जेसीबी समोर ठिय्या मांडून बसले होते. अतिक्रमण हटविण्यास विरोध करू लागले. मात्र प्रशासनाने पोलिस बंदोबस्ताचा वापर करत अतिक्रमण काढले.
मुख्याधिकारी तुषार नेरकर , बांधकाम अभियंता डिगंबर वाघ , सुनील पाटील , मयूर तोंडे , अजित लांडे , आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , किरण कंडारे , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी ,विद्युत अभियंता कुणाल महाले , कर निरीक्षक महेश जोशी , मुकादम नितीन बिऱ्हाडे ,गौतम मोरे यांच्यासह ३८ कर्मचारी , सहाययक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव , पोलीस कर्मचारी व महिला कॉन्स्टेबल ,होमगार्ड असे २० कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी हजर झाले. मुख्य धुळे चोपडा रस्त्यापासून अतिक्रमण काढायला सुरुवात झाली. आणि रहिवाश्यानी पटापट घरातील साहित्य बाहेर काढणे सुरू केले.
नागरिकांना घरातील भांडी ,वरचे पत्रे व इतर साहित्य काढण्यासाठी मुभा दिली जात होती आणि भिंती तसेच पक्के बांधकाम जेसीबी ने पाडणे सुरु होते. एकापाठोपाठ घरे दुकाने पाडली जात होती. सर्वांचे संसाराचे साहित्य उघड्यावर पडलेलेहोते. घरातील लहान मूल किंवा महिला ,म्हातारा व्यक्ती ते साहित्य उन्हात सांभाळत होता आणि इतर जण साहित्य इतरत्र हलवण्यासाठी धडपड करीत होते. कुणी लोटगाडी ,कुणी ट्रॅक्टर तर कुणी हातगाडीवर साहित्य वाहून नेत होते. सायंकाळ पर्यंत अतिक्रमण काढणे सुरू होते.
आता पुढे पर्याय काय?
रस्ता मोकळा झाल्याने शहराच्या दक्षिणेला जाण्यासाठी रस्त्याचे पक्के बांधकाम केल्यास वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होईल. बसस्थानकावर आलेल्या लोकांना प्रशासकीय व महसूल इमारतीकडे जाण्यासाठी सुरळीत मार्ग मिळेल.
मात्र पालिकेने मुख्य धुळे चोपडा रस्त्यावरील सर्व टॅक्सी आणि कालिपिली या गांधीनगर भागात उभ्या केल्यास मुख्य रस्त्याची वाहतूक कोंडी दूर होईल. आणि गांधीनगर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही. तिकडे एक गेट केल्यास बसस्थानक मध्ये येणाऱ्या प्रवाश्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. जी एस हायस्कूल चे बंद गेट पुन्हा सुरू होऊन विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून येण्याचा धोका टळेल. त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराजवळील वाहतूक कोंडी सुटेल.




