
अमळनेर : तालुक्यातील लोण तांडा येथे शॉर्ट सर्किट ने आग लागून शेतातील गव्हाचे पीक ,चारा व ठिबक नळ्या असे सुमारे सव्वा लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना ११ रोजी दुपारी १२ वाजता घडली.

लोण तांडा येथील पोलिस पाटील अनिल महारु राठोड यांच्या गट नंबर ४६/१ व ४६/२ या शेत शिवारात असलेल्या विद्युत खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने शेतात कापून ठेवलेला ६० हजार रुपये किमतीचे गव्हाचे पीक , ३० हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्या ,१० पाईप तसेच शेजारील बापू आसाराम पाटील यांच्या शेतातील ३० हजार रुपये किमतीचा चारा असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला. अमळनेर येथून नगरपरिषदेचा अग्निशमन बंब मागवण्यात आला होता. फायरमन दिनेश बिऱ्हाडे , चालक जाफर पठाण , भिका संदानशिव यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहेत.