
सिंचन क्षमता वाढून गाळामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपीक होतील…
अमळनेर : तालुक्यातील पाझर तलाव,साठवण बंधारे तसेच के. टी.वेयर बंधाऱ्यात वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढण्यात येऊन तो गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य मिळावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात धार – मालपूर, खेडी,वासरे, कळमसरे, भोरटेक या ठिकाणी पाझर तलाव आहेत मात्र वर्षानुवर्षे या पाझर तलावातील गाळ काढण्यात येत नसल्याने साचलेल्या गाळामुळे पाझर तलावातील पाणी साठा तर कमी झालाच आहे सोबतच जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
या अनुषंगाने प्रशासनाने पाहणी करुन धोरण निश्चित करण्याची गरज असून त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण – गाळयुक्त शेतशिवार या शासनाच्या संकल्पनेतून स्वयंसेवी संस्थेकडून अन्यथा शासनाकडून शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ मिळावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली असून पावसाल्यापूर्वी हे धोरण राबविल्यास त्याचा फायदा होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मांडली आहे.
नायब तहसीलदार एस पी कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर दिलीप पाटील,मधुकर पाटील,पांडुरंग पाटील,मोतीलाल महाजन,रामचंद्र पाटील,राजेंद्र पाटील,सुदाम चौधरी ,जगन्नाथ कुंभार ,अनिल सोनवणे , भटू कुंभार , भरत महाजन , जगदीश निकम , गुलाब महाजन ,कडू चौधरी , निखिल प्रतीक ,पंकज पाटील तसेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.