
अमळनेर : तालुक्यातील गांधली व देवळी शिवारातील शेतांमध्ये अचानक पाच ते सहा ठिकाणी आगी लागून सुमारे २५ एकर शेती जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील देवळी येथील मनुदेवी खडी मशीन जवळ अचानक आग लागल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवण्यात आले. नेरकर यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी याना ताबडतोब बंब व पथक पाठवण्याचे आदेश दिले. अग्निशमन दल तसेच आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी पोहचल्यावर समजले की आग गांधली शिवारातून लागली आणि पसरत आली मात्र बऱ्याच अंतरावर पाच ते सहा ठिकाणी आगी लागलेल्या दिसून आल्या. एका सागाच्या शेतात सुका पाला पाचोळा लवकर पेटला. अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी फारुख शेख , जफर पठाण , दिनेश बिऱ्हाडे , मच्छिन्द्र चौधरी , भिका संदानशिव, आकाश संदानशिव ,आकाश बाविस्कर , शेतकरी अशोक पवार , पुंडलिक पाटील , विकास सोनवणे , नरेश धर्मा ,महेंद्र पवार , मोजीलाल पावरा ,कैलास धनगर , राकेश पावरा यांनी दोन बंब , पाण्याचे टँकर , जेसीबी मशीन यांच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. आग विझवण्यासाठी तब्बल तीन तास लागले.
आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र पाच ते सहा वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याने कोणीतरी खोडसाळपणा केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गणेश ठाकरे यांचे सुबाभूळ चे शेत जळून सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. रात्र असल्याने नेमके किती शेतकऱ्यांचे कोणत्या पिकाचे नुकसान झाले हे कळू शकले नाही.




