
खेड्यापाड्यातही पोहचले अनधिकृत ढाबे, बियर शॉपीवर देशी विदेशीची विक्री…
अमळनेर:- तालुक्यातील ग्रामीण भागात व मारवड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर बियर शॉपी मधूनच राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारू विकली जाते. हीच दारू अनेक तंटे निर्माण करणारी ठरत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र कारवाई करण्यास सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात ग्रामीण भागात शांतता नांदावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस दल यांच्या माध्यमातुन अद्याप कडक कारवाई झालेली नाही. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. वाढते अनधिकृत ढाबे व बियर शॉपचे परवाने या सोबतच विदेशी देशी अनधिकृत दारु विक्री पाहता तालुक्यात हे व्यसनाधिनतेचे लोण ग्रामीण भागापर्यंत चांगलीच रुजली आहे. याशिवाय अनेक जेवणाच्या हॉटेल्समध्येही खुले आम दारु प्राशन केली जाते. यातही या खानावळीत खुले आम दारुची विक्री होते. राजकारण असो की निवडणूका अथवा लग्न समारंभ असो यातून जादा खोके रिते होतांना व गाण्यांवर डोलतांना पाहता विदारक चित्र डोळ्यापुढे उभे राहते. ग्रामीण भागात अनेक अनधिकृत हॉटेलची संख्या मोठी असून ग्रामीण भागात दोन चार बियरबार वगळता २५ ते ३० खानावळी सुरु आहेत. यातून सर्व खुले आम दारू विक्री होते व दारू प्राशन करू दिली जाते.
उत्पादन शुल्काची कारवाईच नाही – नेहमी प्रमाणे तोडफोडची कारवाई केल्याचे चित्र उभे करीत उत्पादन शुक्क कार्यालय काम करते. मात्र धडक कामगिरी केल्याचे चित्र नाही. त्यामुळे केवळ पोलीसांना जबाबदार धरतांना उत्पादन शुल्क खातेही तेवढेच जादा बेजबाबदार आहे. अनेक छोटे मोठे गुन्हे या अनधिकृत व्यासायिकांमधून घडतात. हातभट्टीचीही तीच गत आहे. गावोगावी सुरु असलेली मोठ्या प्रमाणावर हातभट्टी सुरु आहे मात्र किरकोळ कारवाई वगळता धडक अशी कारवाईच झालेली नाही. मारवड पोलीस स्टेशन हद्दीत एकूण १३ बियर शॉप आहेत. तर २ बियर बार आहेत. बियर शॉपितून फक्त बियर विक्री झाली पाहिजे मात्र विदेशी दारू परवानगी नसतांना यातून मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारू विक्री होते. याकडे राज्य उत्पादन शुल्काचे लक्ष कधी गेलेले नाही. केवळ हातभट्टी तोडून फोडून कारवाईचे दाखवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांशी विभागाचे साटेलोटे आहे का अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहे.
प्रतिक्रिया…
सोमवारी प्रत्येक तालुक्यातील बियर शॉपी विक्रेत्यांना समज देण्यात येईल. कोणीही अवैध दारू करतांना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून शॉपी सील केली जाईल. आणि ज्या अनधिकृत हॉटेल्समधून ज्यातून दारू विक्री होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल – गोपाल मोरे पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अमळनेर.
प्रतिक्रिया…
पोलिस ठाणे हद्दीतील जितक्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स आहेत. त्यांना शोधुन कडक कारवाई जाईल. अवैध ज्यात दारू विक्री होते. त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. – जिभाऊ पाटील, एपीआय मारवड




