
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील वृंदावन हेल्प फौंडेशन तर्फे पुरातन काळातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरींची साफसफाई करण्यात आली. विहिरीतील गाळ देखील काढण्यात येणार आहे.

मंगरूळ येथे शनिमंदिराजवळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पायऱ्यांची मोठी विहीर असून गावकरी पूजा व विधीसाठी या विहीरीवर येत असतात. त्याच प्रमाणे जून ते ऑक्टोबर दरम्यान विहिरीला पाणी असल्याने मुले पोहण्याचा सराव करतात. पुरातन काळातील विहीर असल्याने विहिरीला महत्व आहे. मात्र आजूबाजूच्या झाडांमुळे विहिरीत घाण झाली होती. तसेच नारळ पूजेचे साहित्य विहिरीत फेकले असल्याने विहिरीत खूप कचरा साचला होता. वृंदावन हेल्प फौंडेशन च्या किरण भिला पाटील , यश किरण पाटील , रोशन संजय पवार , दीपक छोटू पाटील , स्वप्नील प्रवीण देसले , अक्षय विनोद कुंभार ,सीताराम फुलसिंग पावरा यांनी विहिरीतील कचरा काढून सफाई केली. विहिरीतील गाळ देखील काढण्यात येणार आहे.




