
मात्र डॉ. शिंदेंनी पदाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांचे खंडन नाही…
अमळनेर:- येथील डॉ.अनिल शिंदे हे विनाकारण काँग्रेसची प्रतिमा खराब करून बदनामी करीत असून निवडणुकीत पैसे खर्च करण्याची शेखी मिरवून त्यांनी तिकीट मिळवले,पण जनतेची मते ते मिळवू शकले नाहीत, त्यांना आता इतर पक्षात जायचे असल्याने हे उद्योग सुरू केले असल्याचा दावा काँग्रेस पदाधिकारीनी केला. मात्र डॉ. शिंदेंनी केलेल्या विविध आरोपांचे खंडन काँग्रेस पदाधिकारी करू शकले नाहीत.

काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे यांनी जळगाव येथे आयोजित जिल्हा बैठकीत काँगेस जिल्हाध्यक्ष तसेच निवडणूक पक्ष निरीक्षक यांच्यावर विविध आरोप करून धक्का दिल्याने पक्ष आणि पदाधिकारी यांची बाजु मांडण्यासाठी अमळनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी डॉ शिंदेंनी यांनी असे वक्तव्य करून काँग्रेस ची प्रतिमा खराब करून बदनामी केली असे तालुकाध्यक्ष म्हणाले. काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की, डॉ शिंदे हे कोणत्याही पक्षाच्या स्टेज वर जातात, काँग्रेसच्या बैठकीत विनाकारण वाद घालतात,यापुढे त्यानी स्वतःला तपासावे, बिनबुडाचे आरोप ते करत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला जिल्हाध्यक्ष यांनीही डॉ शिंदे यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या आरोपाबद्दल खंत व्यक्त केली.
डॉ. शिंदेवर आरोप मात्र स्वतःवरील आरोपांचे केले नाही खंडन…
काँग्रेसचे पदाधिकारी हे प्रचारासाठी पैसे मागतात असा आरोप डॉ. शिंदे यांनी केला होता. या आरोपावर पदाधिकाऱ्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही. डॉ. शिंदे हे कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा नेत्याकडे जातात असा आरोप ही यावेळी करण्यात आला. मात्र निवडणूक झाल्यावर हेच काँग्रेसचे पदाधिकारी विद्यमान आमदारांचे अभिनंदन करायला गेले होते हे मात्र ते सोयीस्कररीत्या विसरले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गावात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहता पक्षनिष्ठेच्या गोष्टी यांनी कशाच्या आधारे कराव्यात असा सवाल डॉ. शिंदे यांच्या समर्थकांनी केला आहे. डॉ. अनिल शिंदे यांच्याकडूनही पत्रकार परिषद घेऊन योग्य प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची माहिती आहे. डॉ. शिंदे स्पष्टवक्ते व सडेतोड स्वभावाचे असल्याने ते काय प्रत्युत्तर देतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
तालुका काँग्रेसकडे कार्यकर्ते कमी असले तरी वाद जास्त असल्याने या वादातून अनेकांची करमणूक होत आहे. खुर्चीला चिटकून बसण्याच्या प्रवृत्तीतूनच काँग्रेसला घरघर लागली असली तरी नेत्यांचे वाद कमी होत नसल्याने नेत्यांपायी सच्चा कार्यकर्त्यांनी ही पक्षाकडे पाठ फिरवली असल्याची वस्तुस्थिती आहे.




