
२ लाख ८० हजार थकबाकी पोटी पालिकेची कठोर कारवाई…
अमळनेर : मालमत्ता कर थकबाकीपोटी पालिकेने कठोर कारवाई करत हॉटेल साई प्रसाद सील केली असून दोन व्यापाऱ्यांना एक दिवसाची संधी देण्यात आली आहे.

अमळनेर पालिकेची नागरिकांकडे पाणी पट्टी व मालमत्ता कर रुपात सुमारे तीन कोटी थकबाकी आहे. काही मालमत्ता धारक ,व्यापारी कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. पालिकेने थकीत ग्राहकांना नोटिसा आणि तोंडी सूचना तसेच वृत्तपत्रात नाव प्रसिद्ध करूनही नागरिकांनी बाकी अदा केली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले.
उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण , रवींद्र लांबोळे , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल , जगदीश चौधरी , रोहित लांबोळे , इथिक संदानशिव , यश लोहरे , जगदीश बिऱ्हाडे यांनी मार्च अखेरच्या दिवशी धुळे रोडवरील साईप्रसाद हॉटेल सील केली आहे. साईप्रसाद हॉटेल कडे पालिकेची २ लाख ८० हजार रुपये थकबाकी आहे. त्याचप्रमाणे देवाज हॉटेल आणि योगेश हॉटेल यांच्याकडे देखील थकबाकी असून त्यांनी एक दिवसांची मुदत मागितली आहे असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
*नागरिकांनी त्वरित थकबाकी भरावी. मालमत्ता सील करण्याची नामुष्की नागरिकांनी आणू नये.- तुषार नेरकर , मुख्याधिकारी ,अमळनेर नगरपरिषद.*




