
अमळनेर : तालुक्यातील सात्री गाव तसे दुर्दैवीच म्हणावे लागेल. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न याप्रमाणे आग विझवण्यासाठी देखील अडथळे आले. तरी शासन आणि प्रशासन या गावाला रस्ता देईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सात्री गावाला गावाबाहेर काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र तेथे अतिक्रमण असल्याने काम करता येत नव्हते. अखेर अतिक्रमण धारकांनी तेथील अतिक्रमण काढले. तेथील कचरा पेटवण्यात आला. वाऱ्याने ठिणगी पसरली अन नदीकडील भागांच्या घरांना आग लागली. कोरडा चारा ,कुट्टी भरून ठेवलेली असल्याने आगीने अधिकच पेट घेतला. जुनी लाकडे ,शेती अवजार साहित्य , एका घरातील किराणा मालाचे दुकान असल्याने तेल व इतर साहित्य जळू लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. गावकऱ्यांची धावाधाव सुरू झाली. मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाटील विनोद बोरसे यांनी तात्काळ घटना प्रशासन व पोलिसांना कळवली.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , डीवायएसपी विनायक कोते , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , एपीआय जीभाऊ पाटील मुख्याधिकारी तुषार नेरकर घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रित करण्यासाठी अमळनेर , धुळे ,चोपडा , धरणगाव ,पारोळा येथील अग्निशामक बंब मागवण्यात आले. माजी सरपंच महेंद्र बोरसे एका बंबात बसून बंब घेऊन आले.
सात्री गावाला ये जा करण्यासाठी रस्ताच नाही. गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावचे पुनर्वसन होत नाही. पहिला अग्निशमन बंब आला तेव्हा बोरी नदीच्या पात्रात बंब फसला इकडे आग वाढत होती आणि गावकऱ्यांची तडफड सुरू होती. आग विझवावी की गाडी ओढावी. अखेरीस गावकऱ्यांनी जेसीबी मशीन आणि सात्री व डांगरी गावच्या लोकांनी धक्का देऊन गाडी गावात पोहचती केली. सुरुवातीला डांगरी गावातच रस्त्यावर झाड पडल्याने गाडी येण्यास बाधा निर्माण झाली होती. मारवड च्या होमगार्ड आणि पोलिसांनी तो अडथळा बाजूला केला होता. चोपडा येथून येणारी एक गाडी हातेड गावाला रस्त्यावर झाड पडल्याने अडकून पडल्याने तिला विलंब झाला. तोपर्यंत गावकऱ्यांनी घरामधील बकऱ्या व इतर प्राण्यांना बाहेर काढून घेतले होते. वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या इतर ठिकाणी चाऱ्यावर जाऊन पडत असल्याने प्रचंड भीती निर्माण झाली होती. गावकऱ्यांनी आजूबाजूच्या घरांवर देखील पाणी मारून ओले करून ठेवले होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख ,जफर पठाण, आकाश संदानशीव, मच्छीन्द्र चौधरी, मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील , पीएसआय विनोद पाटील, होमगार्ड दिनेश साळुंखे, गोपाल पाटील, विलास कोळी, पुनमसिंग भील आदींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
आगीत रामचंद्र पोपट बोरसे , शालीक पोपट बोरसे , बाळू पोपट बोरसे , विश्वास निंबा बोरसे , यांची घरे जळून किराणा दुकानातील साहित्य ,हरभरा ,गहू असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.




